लातूर : प्रतिनिधी
शहरातील महात्मा फुले बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे किरकोळ बाजारपेठेत भावात वाढ झाली असून, या दरवाढीमुळे किचनचे बजेट कोलमडले आहे. टोमॅटो, वांगी, भेंडी, पत्ता कोबी, दोडके, सिमला मिरची आदींचे भाव ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. बटाटयाचे भाव ५० रुपये प्रतिकिलो तर कांद्याची ५० रुपये प्रतिकिलो दराने किरकोळ बाजारात विक्री सुरु आहे.
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्य:स्थितीत ग्रामीण भागासह शेजारील जिल्ह्यातून पालेभाज्या व फळभाज्यांची आवक होत असते. बाजार समितीत खरेदी केलेला भाजीपाला किरकोळ बाजारसह नागपूर, नांदेड या बाजार समितीत पाठवला जातो. काही प्रमाणात स्थानिक विक्रीसाठी व्यापारी खरेदी करतात. मात्र दर वधारले असून स्थानिक पातळीवर होणारी विक्रीत किंमत वाढली आहे. फळभाज्यांमध्ये सध्या काकडी, घेवडा, शिमला, भोपळा, कारली, दोडका आदी भाज्यांची आवकही घटली आहे.
किरकोळ बाजारामध्ये सध्या शेवगा ८० रुपये किलोने विकल्या जात आहेत. वांगी, काकडी, टमाटो, मिरची, पत्ता कोबी आदी भाज्या ७० ते ८० रुपये दराने विकल्या जात आहेत. मेथी, पालक, शेपु ६० ते ७० रुपये जुडीच्या दराने मिळत आहे. टोमॅटो दर ७० ते ८० रुपये किलोवर गेले आहेत. इतरही भाज्यांचे दर किरकोळ बाजारात ७० ते ८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्या आहेत. तर अजुन काही दिवस अशीच परिस्थिती राहील असा अंदाज व्यापा-यांनी व्यक्त्त केला आहे. शहरातील बाजारपेठेत ग्रामिण भागातून भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मिरची, कोथ्ािंबीर, फुलकोबी, पालक, मेथी आदी भाज्याची मोठया प्रमाणात शेती केली जाते. मात्र गेल्या काही दिवसापासून बाजारपेठेत ही आवकच घटल्याने किरकोळ बाजारात दर काडाडले असल्याचे दिसून येत आहे. शेतक-यांनी खरिपाची पेरणी केलेली आहे.
मृगाचा पाऊस चांगला झाला. शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या. पेरण्या झाल्या, पाऊस पडत राहिला. कोवळी पीके उगवली आणि पाऊस थांबला. पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. उगवलेल्या पिकांचा आता पावसाची आवश्यकता आहे. पाऊस पडला तर पिकांना आधार मिळणार आहे. नवीन भाजीपालाही बाजारात येईल. मात्र तोपर्यंत तरी किरकोळ भाजी मंडईत भाजीपाला महागच मिळणार आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे.