बंगळुरु : बंगळुरुत एक सॉफ्टवेअर कंन्सलटंट, त्याची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचे राहत्या घरातच मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. मुलांना मारुन जोडप्याने आपले जीवन संपवल्याचे वृत्त आहे. मात्र, हा घातपात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादिशेने तपास सुरु असल्याचे पोलिस अधिका-याने सांगितले.
मूळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील हे कुटुंब अनुप कुमार याच्या कामानिमित्ताने बंगळुरु येथे भाड्याने राहत होते. अनुप कुमार (३८), राखी (३५) आणि त्यांचे दोन अपत्य २ वर्षीय मुलगा प्रियांश आणि ५ वर्षीय मुलगी अनुप्रिया असे हे कुटुंब होते. परंतु अनुप यांच्या सुखी संसाराचा वेदनादायी अंत झाला.
सोमवारी सकाळी घराचे मदतनीस कामासाठी आले होते. त्यांनी अनेकदा दरवाजा ठोठावला तरी आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही आणि कुटुंबाशी संपर्क करण्याचा प्रयत्नही केला तरी काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्या मदतनीसाने नंतर शेजा-यांना कळवले, त्यानंतर गोंधळ उडाला, सर्वांनी मग पोलिसांना कळवले. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यावर त्यांना त्या दाम्पत्याचे आणि त्यांच्या मुलांचे मृतदेह आढळून आले.