छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच आपली ही मागणी मान्य झाली नाही तर राज्य बंद असे समजयाचे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आम्ही न्यायाच्या बाजूने आहोत, या राज्यात वाईट चित्र पाहण्याची वेळ मंत्री धनंजय मुंडेंच्या टोळीने आणली आहे. त्यांनी पाप झाकण्यासाठी वाईट वळण लावले आहे. खंडणी आणि हत्येतील आरोपी एकच आहेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात जनआक्रोश मोर्चे सुरू आहेत. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला कडक इशारा दिला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांच्या कुटुंबाशी पाठीशी भरणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीयांच्यासुद्धा पाठीशी उभे राहणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
देशमुख हत्या प्रकरणात फार मोठे नेटवर्क असून खंडणी, खून, पैसा पुरवणारे, त्यांना लपवणारे, डाके टाकणारे,बलात्कार, छेडछाड करणा-या यांच्या टीम असल्याचे ते म्हणाले. ज्यांनी खून करायला पाठवले, सामूहिक कट रचणारा सगळ््यात मोठा गुन्हेगार असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याने लोक शांत आहेत. यातील एकही जण सुटला तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी असल्याचा इशारा जरांगे पाटील यांना दिला. खंडणी आणि खून करणा-यांना सांभाळलं कुणी, हे चार्जशीटमध्ये आलेच पाहिजे, अशी मागणीसुद्धा त्यांनी केली. ज्या दिवशी आरोपी सुटतील असे वाटेल, त्या दिवशी राज्य बंद करू, असा इशारा पाटील यांनी दिला.
मुंडेंच्या टोळ््या संपवा
देशमुख कुटुंबाला आलेली वेळ ही राज्यात कोणावरही येऊ नये. आज देशमुख कुटुंबावर वनवास आला आहे. हे पुढील काळात होऊ द्यायचे नसेल तर तर धनंजय मुंडेंच्या टोळ््या संपवा असे ते म्हणाले. धनंजय मुंडेंची त्यांच्या लोकांना मूक संमती असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंडे यांच्या टोळीच्या विरोधात बोलावच लागणार आहे. ते मस्तीत येणार असले तर विषय अवघड होईल असे ते म्हणाले.