तेहरान : वृत्तसंस्था
इराण आणि इस्रायल यांच्यामधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. इराणने अलीकडेच इस्रायलवर हल्ला केला होता. तेव्हा इस्रायलवर १८० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती. त्यानंतर आता इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाकडून मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायलने आता इराणमधील सत्ताबदल आपले ध्येय बनवले आहे.
इराणमध्ये सत्ताबदल झाल्याशिवाय इस्रायल स्वत:ला सुरक्षित समजत नाही. इराणची राजवट उलथून टाकण्याबाबत इस्रायलने अमेरिकेशी यापूर्वीच चर्चा केली आहे. इस्रायलने पाच तासांची मॅरेथॉन बैठक घेतली आणि त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांच्यात ३० मिनिटे चर्चा झाली. तसेच, इस्रायलसाठी धोकादायक बनलेल्या इराणची राजवट उलथून टाकण्याची ब्लू प्रिंट अमेरिकेने तयार केली आहे.
इराणला लक्ष्य करण्यास इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली रात्री उशिरा हा निर्णय घेण्यात आला. इराणने इस्रायलवर हल्ला केल्यापासून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांची टीम इस्रायलच्या निशाण्यावर आहे. इस्रायलने सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांच्या टीमला सत्तेवरून हटविण्याची आणि इराणी लोकांना कट्टरतावादी राजवटीपासून मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.