18.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeपरभणीखून प्रकरणी आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास

खून प्रकरणी आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास

परभणी : एक वर्षापूर्वी चाकूने गळ्यावर वार केल्याने रक्तस्त्राव होवून एकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. या सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास ठोठावला आहे. दुसरे जिल्हा सत्र न्यायाधीश ए.ए.ए. शेख यांनी हा निकाल दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नसरीन बेगम शेख रफीक यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की, दि.२३ जानेवारी २०२२ रोजी त्यांची बहीण शाहीण बेगम यांनी फोन करुन फिर्यादीची मुलगी शरीन बेगम हिला तिचा दिर शेख मेराज उर्फ मेहराज शेख शकील याने पोटावर लाथ मारल्याने तिच्या पोटात दुखत आहे व ती सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहे.

माहिती मिळताच फिर्यादी व तिचा पती शेख रफीक शेख गणी व मुलगा शेख यासीन हे दुचाकीवर मुलीचे रिपोर्ट घेवुन सरकारी दवाखान्यात जात असताना आरोपी शेख मेराज उर्फ मेहराज शेख शकील हा समद प्लॉटींगच्या कॉर्नरजवळ उभा होता. त्याने दुचाकीला लाथ मारल्याने फिर्यादी व तिचा पती, मुलगा खाली पडले. त्यानंतर आरोपी शेख मेहराज याने मैं तुमको जिंदा नही छोडुंगा तुझे खतम करता असे म्हणुन फिर्यादीचा पतीच्या गळयावर चाकु मारला. त्यामध्ये शेख रफीक जखमी झाल्याने त्यास सरकारी व खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. परंतु अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यु झाला. या प्रकरणी भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सांगळे यांनी केला. त्यामध्ये त्यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदविले, घटनास्थळ पंचनामा केला, आरोपीकडुन गुन्हयात वापरलेले शस्त्र जप्त केले. आरोपीच्या कपडयावर व शस्त्रावर रक्ताचे डाग आढळून आले होते. तपासाअंती सपोनि सांगळे यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. हा खटला दुसरे जिल्हा सत्र न्यायाधीश ए.ए.ए. शेख यांच्या न्यायालयात चालला. त्यामध्ये सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील नितीन खळीकर यांनी एकुण ६ साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षीतून शेख रफीक यांचा मृत्यू केवळ हा मनुष्यवध असून जप्त केलेल्या शस्त्रामुळेच झाला असे निष्पन्न झाले.

आरोपीचे जप्त केलेले कपडे व आरोपीकडुन जप्त केलेले शस्त्र (चाकु) यावर मयत शेख रफीक यांच्या रक्ताचा अंश आढळुन आला. आरोपीने त्याबद्दल कोणताही खुलासा केला नाही. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी न्यायालयासमोर आरोपी शे.मेराज याने चाकुने गळ्यावर वार करुन खुन केला असे सांगितले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थीतीजन्य पुरावे यावर आधारीत युक्तीवाद करुन शिक्षा द्यावी अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील खळीकर यांनी न्यायालयाला केली.

त्यावरुन न्यायालयाने आरोपीस सदोष मनुष्यवधाच्या अपराधासाठी दोषी धरले व आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास व १५,००० रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावास तसेच कलम ३४१ भादंवि नुसार ५०० रूपये दंड व दंड न भरल्यास ७ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात मुख्य सरकारी वकील अ‍ॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी वकील नितीन खळीकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजु मांडली. तसेच पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सपोनि. संतोष सानप, पोउपनि सुरेश चव्हाण, कोर्ट पैरवी अंमलदार पोह. डी. के. खुणे यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR