20.8 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रगडचिरोलीत २ जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोलीत २ जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण

दोघांसाठी ८ लाखांचे जाहीर केले होते बक्षीस
गडचिरोली : प्रतिनिधी
तब्बल ३२ वर्षे नक्षलवादी चळवळीत कार्यरत असलेल्या नरसिंग या जहाल नक्षलवाद्यासह दोघांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याने नक्षलवादी चळवळीला पुन्हा एकदा हादरा बसला आहे.

एरिया कमिटी मेंबर रामसू दुर्गू पोयाम ऊर्फ नरसिंग (५५, रा. गट्टानेली, ता. धानोरा) व दलम सदस्य रमेश शामू कुंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित (२५ , रा. वेडमेट्टा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) अशी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नावे असून दोघांवर एकूण ८ लाखांचे बक्षीस होते. मागील काही वर्षांपासून नक्षलवादाविरोधात पोलिस दलाकडून आक्रमक धोरण राबविण्यात येत आहे. सोबतच प्रशासनाकडून आत्मसमर्पितांसाठी विविध योजनादेखील सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांचा आत्मसमर्पणाकडे कल वाढला आहे.

दरम्यान, २० डिसेंबरला १९९२ पासून नक्षलवादी चळवळीत सक्रिय असलेला जहाल नक्षलवादी नरसिंग आणि रमेश कुंजाम या दोघांनी गडचिरोली पोलिस दलापुढे आत्मसमर्पण केले. दोघांवरही खून, जाळपोळ, चकमक प्रकरणी डझनभर गुन्हे दाखल आहेत. यातील रामसू दुर्गू पोयाम ऊर्फ नरसिंग हा १९९२ पासून नक्षलवादी चळवळीत आहे. १९९२ मध्ये तो टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला.१९९५ मध्ये काकुर दलममध्ये राहून सन १९९६ पर्यंत नक्षलवाद्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरक्षा देण्याचे काम तो करीत होता. पुन्हा तो टिपागड दलमसाठी काम करु लागला. पुढे माड एरिया (छत्तीसगड) येथे बदली होऊन २००१ पर्यंत त्याने पुरवठा टीममध्ये काम केले. २०१० पासून तो कुतुल आणि नेलनार दलममध्ये एरिया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत होता. त्याच्यावर १२ गुन्हे नोंद असून ६ चकमक, ५ खून, १ दरोडा प्रकरणात त्याचा सहभाग राहिलेला आहे. रमेश शामू कुंजाम हा २०१९ पासून माओवादी चळवळीत आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR