24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयगाझामधील इस्रायलचा ‘नरसंहार’ थांबला पाहिजे

गाझामधील इस्रायलचा ‘नरसंहार’ थांबला पाहिजे

नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी आज गाझामध्ये निष्पाप लोक मारले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी जगातील प्रत्येक सरकारला गाझामधील इस्रायलच्या लष्करी हल्ल्याचा निषेध करण्याचे आवाहन देखील केले आहे. प्रियंका गांधींनी एक्सवर पोस्ट करून म्हटले की, गाझातील निष्पाप मुलांसाठी डॉक्टर, पत्रकार, आई, वडील, नर्स, लेखक, जेष्ठ नागरिकांसाठी फक्त बोलणे पुरेसे नाही, तर प्रत्येक उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीची आणि जगातील प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी गाझातील नरसंहार थांबवण्यासाठी इस्रायल सरकारवर दबाव टाकावा असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

प्रियंका गांधी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावरही निशाणा साधला. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभागृहाला संबोधित केले. यानंतर दोन्ही सभागृहातील खासदारांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. त्याचवेळी काही नेत्यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांचे भाषण ऐतिहासिक असल्याचे सांगितले होते. सभ्यता आणि नैतिकतेचा दावा करणा-या जगात त्यांची कृती अस्वीकार्ह असल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या. त्यांनी अमेरिकन नेत्यांची खिल्ली उडवली आणि म्हटले की, जे मानवता आणि सभ्यतेवर विश्वास ठेवतात त्यांनी असे करू नये. गाझामध्ये इस्रायलकडून पाश्चिमात्त्य देशांच्या पाठिंब्याने सुरू असलेला रानटीपणा पाहणे लाजिरवाणे आहे, अशी सडकून टीकाही त्यांनी केली.

प्रियंका गांधी-वाड्रा यांनी गाझामधील इस्रायलच्या कारवाईचे समर्थन केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायावर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारीमध्ये प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, न्याय, मानवता आणि आंतरराष्ट्रीय शालीनतेचे सर्व नियम मोडले गेले आहेत. गाझामध्ये होत असलेल्या नरसंहाराकडे आंतरराष्ट्रीय समुदाय आंधळेपणाने पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR