पाटणा : वृत्तसंस्था
बिहार सरकारने विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. बिहार सरकारच्या निर्णयाने शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दिले जाणारे टोमणे बंद होणार आहेत. काही शिक्षक शारीरिक व्यंगावरून विद्यार्थ्यांना टोमणे मारतात. याच टोमण्यावर सरकारने मर्यादा आणल्या आहेत.
काही शिक्षक वर्गात सर्रास विद्यार्थ्यांना गाढव, रंगाने सावळा असेल तर त्याला ‘कल्लू’ असे टोमणे मारतात. या टोमण्यावर बंदी घालण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे. नव्या आदेशानुसार, बिहारमध्ये सरकारी शाळेत शिक्षकांना मस्करीत विद्यार्थ्यांच्या शारीरिक व्यंगावर बोलता येणार नाही. शिक्षण विभागाचे म्हणणे आहे की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आदर केला पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या प्रतिष्ठेचा सन्मान केला पाहिजे. विभागाच्या आदेशानुसार, शिक्षकांना विद्यार्थ्यांना टोपणनावाने हाक मारता येणार नाही.
बॅक बेंचरला मॉनिटर पद
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, आता अभ्यासात कच्चा असणा-या विद्यार्थ्याला देखील मॉनिटर बनण्याची संधी मिळणार आहे. शाळेला कंटाळून घर सोडू इच्छिणा-या विद्यार्थ्यांना समजाविण्याची जबाबदारी नव्या मॉनिटरवर असणार आहे. मॉनिटर त्यांना शाळेत येण्यासाठी प्रेरित करेल. तसेच वर्गातील वातावरण चांगले राहावे, यासाठी मदत करेल.