मुंबई : प्रतिनिधी
शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गो-हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अशाप्रकारचे वक्तव्य करण्याची गरज नव्हती. गरज नसताना, असे विधान केल्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला तडा गेला. गो-हे यांनी स्वत: स्पष्टीकरण द्यावे, अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी घेतली आहे, असे समजते.
दरम्यान, दिल्लीत अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळते, असे विधान करत उपसभापती नीलम गो-हे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘टार्गेट’ केले होते. यानंतर खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी गो-हे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. शिंदेंच्या शिवसेनेतील एक-दोन नेते सोडले, तर कुणीही त्यांच्या बचावासाठी समोर आले नाही. त्यामुळे नीलम गो-हे यांच्या वक्तव्यावरून शिंदेंच्या शिवसेनेतच नाराजी असल्याचे समोर आले आहे.
नीलम गो-हेंच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी मर्सिडीज दाखवा, असे आव्हान दिले होते. ‘हे गैरगुजरी लोक आहेत. त्यांनी त्यांचे राजकारणात चांगभले केले आहे,’ असे म्हणत ठाकरेंनी गो-हेंना सुनावले होते. तर, संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी गो-हेंचा ‘नमकहराम’ असा उल्लेख केला होता. तसेच, सुषमा अंधारे यांनी गो-हेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. एकप्रकारचे गो-हेंना ठाकरेंच्या शिवसेनेने चांगलेच घेरले आहे. दुसरीकडे, शिंदे गटातून मंत्री संजय शिरसाट, खासदार नरेश म्हस्के, प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या व्यतिरिक्त गो-हेंच्या बचावासाठी कुणी आले नाही.
दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनीही गो-हेंना फटकारले होते. ‘चार पक्ष बदलणा-या गो-हेंना कमी कालावधीत इतकी पदे कशी मिळाली हे महाराष्ट्राला माहीत आहे. गो-हेंनी केलेले विधान मूर्खपणाचे आहे,’ असे शरद पवार यांनी म्हटले होते. दरम्यान, गो-हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. त्यानंतर दोन दिवसांत प्रसारमाध्यमांमध्ये आपली भूमिका व्यक्त करणार असल्याची माहिती मिळाली आहे.