मुंबई : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यासोबत असलेल्या आमदारापैकी सर्वाधिक चर्चेत असलेले आमदार म्हणून भरत गोगावले यांची ओळख आहे. भरत गोगावले यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागेल आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळेल, अशी आशा होती. मात्र, विधानसभेचा कार्यकाळ संपत आला तरी गोगावले यांना मंत्रिपद मिळाले नाही. अखेर राज्य सरकारने आज शासन निर्णय जारी करत त्यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केलीे. भरत गोगावले यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट, हेमंत पाटील, आनंदराव अडसूळ यांना विविध मंडळांवर नेमले होते. त्यावेळेपासूनच भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिले जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले असून भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला.