लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेने ७८६ ग्रामपंचायतींनी घरपट्टी व पाणी पट्टी कराची वसुली करण्यासाठी विशेष कर वसुली दिन मोहिम राबवून वर्षभरात ६३ कोटी ५ लाख ३२ हजार रूपयांची पाणी पट्टी व घरपट्टी वसूली करण्यात आली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कर वसूलीत १.२४ टक्के कमी झाली आहे.
लातूर जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतीची २०२४-२०२५ या वर्षाची कर मागणी घरपट्टी २६ कोटी ८७ लाख ८५ हजार रूपये व पाणी पट्टी ४१ कोटी ८१ लाख ९ हजार रूपये अशी ६८ कोटी ६८ लाख ९४ हजार रुपयांची मागणी होतीे. ग्रामपंचायतींच्याकडे मार्च अखेर पर्यंत घरपटटी २४ कोटी ७७ लक्ष १४ हजार व पाणी पटटी ३८ कोटी २८ लाख १८ हजार रूपये असा ६३ कोटी ५ लाख ३२ हजार रूपये कराचा भरणा नागरीकांनी केला आहे. विविध विकासाच्या निधी बरोबरच ग्रामपंचायतींना खर्चासाठी ग्रामपंचायतीचा स्वनिधी उपलब्ध झाला आहे.
यावर्षी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतीकडे थकीत कर वसूलीसाठी चार टप्यात विशेष मोहिम राबविल्यामुळे कर वसूलीच्या मोहिमेस गती मिळाली. असे असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी १.२४ टक्के कर वसूली कमी झाली आहे.