लातूर : प्रतिनिधी
शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईतील सुमारे ६० वर्षांपुर्वी बांधलेली घंटे लॉजची जुनी, जिर्ण इमारतीचा दक्षीणेकडील भाग दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोसळला. अत्यंत गजबजलेल्या या भागात इमारत कोसळली. मात्र सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. इमारतीचा कोसळलेला भाग एक ऑटोरिक्षा व तीन दुचाकींवर पडल्याने या चार वाहनांचे मोठे नुकसान झाले.
गंजगोलाईत १०० बाय १०० च्या जागेत घंटे लॉजची इमारात आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर विविध प्रकारची २२ दुकाने आहेत. पहिल्या मजल्यावर लॉज आहे. या लॉजचे १० ते १२ रुम आहेत. ६० वर्षांपुर्वी बांधलेली ही इमारात राहण्यास, वापरण्यास योग्य नाही. ही इमारात जुनी, जिर्ण झालेली आहे. त्यामुळे ही इमारात पाडून घ्यावी, अशी नोटीस लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी बजावण्यात येते. परंतु, इमारत मालक महानगरपालिकेच्या नोटिसीला जूमानत नसल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या दक्षीणेकडील भाग कोसळला. अत्यंत रहदारीचा हा परिसर आहे. परंतू, सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही. परंतु, या इमारतीचा भाग एमएच २४ ए, टी ८८५६ या क्रमांकाचा ऑटोरिक्षा, एमएच २४ बी, झेड २७९८, एमएच २४ बी, ६३१२ आणि आणखी एक अशा तीन दुचाकींवर कोसळल्याने ही चारही वाहने मलब्याखाली बदून मोठे नुकसान झाले.
लातूर शहर महानगरपालिकेचे शहरात ए., बी., सी. व डी., असे चार क्षेत्रीय कार्यालय आहेत. या चारही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत म्हणजेच लातूर शहरात शंभराहून अधिक जुन्या, जिर्ण इमारती आहेत. ‘सी’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २८ जुन्या, जिर्ण इमारती होत्या. त्यापैकी १४ जिर्ण इमारती पाडण्यात आल्या आहेत. उर्वरीत १४ जिर्ण इमारती अद्यापही तशाच उभ्या असून त्यापैकीच एक घंटे लॉजची इमारत आहे.