मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यभर मनसे नेत्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. प्रत्यक्षात राज ठाकरे यांनी मैदानात उतरत महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. मात्र मनसेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नसल्याची खंत मनसे नेत्यांनी व्यक्त केली. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शपथविधीसाठी आम्हाला आमंत्रण मिळाले असते तर आनंद झाला असता असे म्हटले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी नरेंद्र मोदी यांनी तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला देशभरातील मान्यवरांसह परदेशातील प्रमुख पाहुणे देखील उपस्थित होते. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र महाराष्ट्रात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणा-या मनसेला या सोहळ्यासाठी निमंत्रित न केल्याने मनसे नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
या सगळ्या प्रकरणावर आता भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. ही गोष्ट मी वरिष्ठांच्या कानावर टाकणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. कधी कधी घाईमध्ये निमंत्रण देताना जी यादी करतात तिथे कधी कधी आपले मित्र आहेत त्यांना निमंत्रण द्यायचे राहून जाते. केंद्रीय पक्षाने याची नोंद घ्यायला हवी. आपल्याला जेव्हा एखादा मित्र मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा असे होऊ नये याची काळजी घ्यायला हवी, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.