नागपूर : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला असून ३९ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या या सोहळ्यात चंद्रशेखर बावनकुळे यांना शपथ घेण्याचा पहिला मान मिळाला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. २०१९ च्या निवडणुकीवेळी बानवकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती.
नागपूरमधील कामठी विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व करत असलेल्या बावनकुळे यांनी दुसऱ्यांचा मंत्रिपदाची शपथ घेतली. ते २००४ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर बानवकुळे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली होती. त्यांना ऊर्जामंत्रिपद मिळाले होते.
२०१९ च्या निवडणुकीवेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे विधान परिषदेत पुनर्वसन करण्यात आले. तसेच २०२२ पासून ते भाजपचे प्रदेशाध्यक्षही आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा बावनकुळे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना कामठीमधून उमेदवारी देण्यात आली. ते मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातून विजयी झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४ च्या मंत्रिमंडळात काम केलेले बावनकुळे पुन्हा मंत्रिमंडळात दिसणार आहेत. दरम्यान, भाजपचे १९, शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांना शपथ देण्यात आली. मागील मंत्रिमंडळातील अनेकांचा पत्ता कापण्यात आला आहे. तर काही नवीन चेहऱ्यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
अडीच वर्षेच मंत्रिपद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना काही मंत्र्यांना अडीच-अडीच वर्षेच मंत्रिपद मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेमध्येही हाच फॉर्म्यूला राबवला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे आता कोणत्या मंत्र्यांना केवळ अडीच वर्षेच मंत्रिपद मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.