अमरावती : प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. चांगली मुलगी नोकरीवाल्याला, दोन नंबरची दुकानदाराला, तीन नंबरचा गाळ शेतक-याच्या गळ्यात, असे वक्तव्य आमदार देवेंद्र भुयारांनी केले आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी देवेंद्र भुयारांवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहता नोकरी नसलेल्या, शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. मुंबई, पुण्यात नोकरी असणा-या मुलांना विवाहासाठी मागणी वाढत आहे. या प्रश्नाविषयी बोलताना आमदार देवेंद्र भुयार यांनी हे वक्तव्य केले आहे.
देवेंद्र भुयार म्हणाले, आज जर लग्नासाठी मुलगी पाहिजे असेल तर मुलाला नोकरीवाला पाहिजे. मुलगी स्मार्ट आणि एक नंबर देखणी असेल तर ती मुलगी तुमच्या-माझ्यासारख्या पोट्ट्याला भेटणार नाही. ती नोकरी करणा-या मुलांना मिळते. दोन नंबरची मुलगी कोणाला मिळते, ज्यांचा धंदा आहे, पानटपरी, किराणा दुकान आहे अशा मुलांना मिळते. तीन नंबरचा जो राहिलेला गाळ आहे तो हेबडली हाबडली जी पोरगी आहे, ती शेतक-यांच्या मुलांना मिळते.
भुयार पुढे म्हणाले, म्हणजे शेतक-यांच्या पोराचं खरं राहिलं नाही. कारण जन्माला येणारे जे लेकरू आहे ते हेबंड वांभडच निघत राहील. म्हणजे माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वानराचे पिल्लू असा सगळा कार्यक्रम आहे. म्हणून तुम्ही जरा सावध राहा.
भुयारांचे वक्तव्य शेतक-यांची टिंगल उडवणारे : सुषमा अंधारे
देवेंद्र भुयारांच्या या वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, देवेंद्र भुयारांचे हे वाह्यात वक्तव्य फक्त महिलांचाच अवमान नाही तर कृषीक्षेत्रामध्ये राबणा-या भूमिपुत्रांची अवहेलना तथा कृषीक्षेत्राबद्दल अनास्था निर्माण करणारे, शेतक-यांची टिंगल उडवणारे आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांच्याकडून या वाचाळवीरांना अजिबात आवर घातला जात नाही हे दु:खद आहे.