जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यातील वांजरवाडा परिसरामध्ये दहा ते बारा गावात दि १६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे वांजरवाडा परिसरातील दहा ते बारा गावातील चार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान जळकोटचे तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त गावांना भेटी देऊन तेथील शेतीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली . जवळपास एक ते दीड तास मुसळधार पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. नदी नाले अर्ध्या तासांमध्येच दुथडी भरून व्हाऊ लागले. नदीकाठच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले अक्षरशा जमिनी खरडून गेल्या. पिके ही माती सकट वाहून गेली.
शेतीमधील कालवे फुटून शेतीचे नुकसान झाले. सोयाबीन कापूस तसेच मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या मूक काढणीला आला होता परंतु हा मूग आडवा पडला आहे. सोयाबीन आडवे पडले आहे. कापसाचही नुकसान झाले आहे. शेतक-यांंनी याची माहिती तालुका कृषी अधिकारी यांना दिली असता तातडीने तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी अनेक शेतक-यांच्या शेतात भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली .
तालुक्यातील वांजरवाडा, होकर्णा, वडगाव, सोरगा, शेलदरा, केकत शिंदगी, चाटेवाडी, उमरदरा, या गावामध्ये अतिवृष्टी झाली. यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. होकर्णा गावात पुराचे पाणी शिरले, सदर गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे या गावातील शेतक-यांनी तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. वांजरवडा परिसरातील शेतक-यांच्या शेतीमधील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मन्मथ किडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव जाधव, माजी सभापती बालाजी ताकबीडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम हासुळे पाटील यांनी केली आहे तलाठी बेंबडे, कृषी सहायक इंगळे, कृषी सहायक श्रीमती खलसे, कृषी सहायक अर्जुन रेडडी या कर्मचा-यांनी नुकसानीची पाहणी केली.