२५ चौकार, २२ षटकार, सर्वोच्च धावसंख्या करणारा दुसरा संघ
हैदराबाद : वृत्तसंस्था
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने दस-याच्या दिवशी विजयाचे तोरण बांधले. भारताने तिस-या सामन्यात दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने टी २० मालिकेत बांगलादेशवर ३-० असे निर्भेळ यश मिळवले. संजू सॅमसनचे तुफानी शतक आणि त्याला सूर्याच्या मिळालेल्या झंझावाती साथीच्या जोरावर भारताने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. भारताने या सामन्यात २९७ धावांचा डोंगर उभारला आणि बांगला देशाविरुद्ध १३३ धावांनी मोठा विजय साकारला. या सामन्यात चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी १५ चौकार आणि २२ षटकार ठोकले.
टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात हैदराबादमध्ये तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांनी हैदराबादच्या स्टेडियममध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली आणि बांगलादेशसमोर २९८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवत टी-ट्वेंटीमध्ये सर्वाधिक धावा करणारा टीम इंडिया दुसरा संघ ठरला. भारताकडून संजू सॅमसनने शतक झळकावले, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले. सॅमसनने अवघ्या ४० चेंडूत शतक झळकावले, जे या फॉरमॅटमधील भारताचे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. सॅमसनने कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत दुस-या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारी केली.
केवळ सॅमसन आणि सूर्यकुमार यांच्या खेळीच्या जोरावर भारताला एवढी मोठी धावसंख्या गाठण्यात यश आले. अभिषेक शर्मा लवकर बाद झाल्यानंतर सॅमसन आणि सूर्यकुमार यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना वेठीस धरले आणि आक्रमक फलंदाजी केली. सॅमसन ४७ चेंडूंत ११ चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने १११ धावा करून बाद झाला तर सूर्यकुमार ३५ चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ७५ धावा करून बाद झाला. सॅमसन आणि सूर्यकुमार बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि रायन पराग यांनी भागीदारी रचली आणि अवघ्या २६ चेंडूत ७० धावा जोडून भारताची धावसंख्या ३०० च्या जवळ नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.