नवी दिल्ली : दिल्लीत विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या सदस्यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात संसदेत शपथविधी सोहळ्यादरम्यान ‘जय पॅलेस्टाईन’ घोषणा दिल्याबद्दल निषेध व्यक्त केला. यावेळी दोन्ही संघटनांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमकही झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. दोन्ही संघटनांच्या सदस्यांनी बॅरिकेडिंगवर चढून घोषणाबाजी केली. २५ जून रोजी संसदेत शपथविधी सोहळ्यात हैदराबादमधून पुन्हा एकदा खासदार झालेले असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत शपथ घेतल्यानंतर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. याबाबत सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी निषेध नोंदवला. नंतर सभापतींनी ते रेकॉर्डवरून काढून टाकण्याचे निर्देश दिले. मात्र, भाजप समर्थक संघटनांनी या प्रकरणावरून ओवेसी यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करत आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच काही समाजकंटकांनी ओवेसी यांच्या दिल्लीतील निवासस्थावर शाईफेक करून तोडफोड केली होती. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावडे या प्रकरणाची तक्रार केली होती.
.