22.6 C
Latur
Saturday, January 18, 2025

जय हो !

नियमित ऑलिम्पिक स्पर्धेनंतर त्याच ठिकाणी पॅरालिम्पिक स्पर्धा होते. १९४८ मध्ये युद्धात जखमी वा जायबंदी झालेल्या सैनिकांचे मनोबल उंचावण्याच्या हेतूने या पॅरालिम्पिक स्पर्धेचा जन्म झाला. १९६० साली रोममध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत चारशे खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. मात्र, हळूहळू या स्पर्धेतील खेळाडूंची संख्या व स्पर्धेचा दर्जाही वाढत गेला. यावर्षी पॅरिसमध्ये पार पडलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत जगातल्या ७९ देशांमधील चार हजार खेळाडू सहभागी झाले. अशा या प्रतिष्ठेच्या व प्रेरणादायी स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक व विक्रमी कामगिरी करून भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. तशी आपल्या देशात मागच्या दशकापर्यंत नियमित ऑलिम्पिक स्पर्धेची चर्चा ही अत्यल्प प्रमाणात व्हायची. त्यामागे या स्पर्धेतील भारतीय खेळाडूंनी केलेली निराशाजनक कामगिरी हे कारण असायचे. त्यामुळे नियमित ऑलिम्पिकनंतर त्याच ठिकाणी पॅरालिम्पिक स्पर्धा होते याचा कित्येक भारतीयांना गंधही नव्हता.

मात्र, या दशकभरात भारतीय खेळाडूंची नियमित व पॅरालिम्पिक स्पर्धेतील कामगिरी लक्षणीयरीत्या सुधारत असल्याने आता भारतीयांमध्ये ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धांबाबतचे आकर्षण व उत्सुकता वाढत चालली आहे. असे असले तरी नियमित ऑलिम्पिकमध्ये पदकांची संख्या दोन आकडी करण्याचे आपले स्वप्न अद्याप अधुरेच आहे. आजही भारताच्या तुलनेत अगदी छोटे असलेले देशही भारतापेक्षा जास्त पदके पटकावून जातात, याची आपल्याला खंत आहे. मात्र, नियमित ऑलिम्पिकमध्ये अपुरे राहिलेले हे स्वप्न भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत पूर्ण केले आहे. भारतीय खेळाडूंनी दोन आकडी पदके पटकाविण्याचे स्वप्न तर पूर्ण केलेच पण प्रथमच पदकतालिकेतील पहिल्या २० देशांच्या यादीत भारताचे नाव झळकवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत ७ सुवर्ण, ९ रौप्य व १३ कांस्यपदकांसह एकूण २९ पदके पटकाविण्याची आजवरची सर्वोच्च कामगिरी केली आहे.

मागच्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने १९ पदकांची कमाई केली होती. यावेळी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीत जोरदार सुधारणा करताना दहा जादा पदके पटकावली. त्यामुळे टोकियोत २४ व्या क्रमांकावर समाधान मानाव्या लागलेल्या भारताने यावेळी पदकतालिकेत ६ स्थानांची झेप घेत १८ वे स्थान प्राप्त करत भारताचा तिरंगा डौलाने फडकावला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी नोंदविताना भारताच्या अनेक खेळाडूंनी स्पर्धेत नवे विक्रमही प्रस्थापित केले आहेत, हे विशेष! भारतीय पथकात ८४ खेळाडूंचा समावेश होता. त्यात सात खेळाडंूनी सुवर्ण यश प्राप्त केले. नेमबाज अवनी लखेराने सलग दोन स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकाविण्याचा विक्रम नोंदवला. शारीरिक दुर्बलता, आर्थिक अडचणी, प्रशिक्षणाच्या अपु-या सुविधा आणि आजही दिव्यांगांकडे पाहण्याची समाजाची हेटाळणीची नजर या सगळ्यांचा सामना करत त्यावर अपूर्व मनोबलाने मात करत दिव्यांगांनी मिळविलेले हे विक्रमी व ऐतिहासिक यश भारतीयांची दृष्टी बदलून टाकणारे व देशातील प्रत्येक दिव्यांगास अभूतपूर्व प्रेरणा मिळवून देणारे आहे.

भारतीय खेळाडूंच्या या देदीप्यमान कामगिरीने क्रीडाप्रेमी भारतीयांचा ऊर अभिमानाने व आनंदाने भरून आला असल्यास नवल ते काय? या पॅरालिम्पिक स्पर्धेतून अनेक प्रेरणादायी यशोगाथा लिहिल्या गेल्या. जन्मानंतर सहाव्या दिवसापासून दोन्ही पाय प्लास्टरमध्ये असताना अ‍ॅथलेटिक्समध्ये तिरंगा डौलाने फडकवणारी प्रीती पाल, कोमातून बाहेर येऊन सर्वांची मने जिंकणारी महाराष्ट्राची भाग्यश्री जाधव, कृत्रिम पायांनी डोळ्याचे पारणे फेडणारे पदलालित्य दाखवत बॅडमिंटन खेळणारा नितेश कुमार, आपल्या उंचीपेक्षा अधिक उंच भाला फेकून सुवर्णपदक पटकाविणारा नवदीपसिंह अशा अनेक खेळाडूंनी क्रीडा रसिकांना त्यांच्या जिगरबाज कौशल्याचे दर्शन घडवून अक्षरश: अचंबित केले. पदकांच्या विक्रमी संख्येने भारतीयांची मान गौरवाने उंचावलीच पण हे यश देशातील दिव्यांगांच्या स्वयंपूर्णता व सबलीकरणाच्या दृष्टीनेही अत्यंत मोलाचे आहे. केंद्र व विविध राज्यांच्या सरकारांनी व पॅरालिम्पिक समितीने घेतलेल्या पुढाकारालाही या ऐतिहासिक यशाचे श्रेय द्यावेच लागेल! टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी २६ कोटी रुपयांची तरतूद होती. यावेळी वाढवून ती ७४ कोटी करण्यात आली.

त्यामुळे खेळाडूंना मिळणा-या सुविधा, प्रशिक्षण, अत्याधुनिक तंत्रज्ञान, वैद्यकीय सा यात मोठी सुधारणा झाली. त्याचा सकारात्मक परिणाम खेळाडूंची कामगिरी उंचावण्यात दिसून आला. अर्थात भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेत आपल्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा केली असली तरी या स्पर्धेवरही आपला दबदबा कायम ठेवणा-या चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांच्या तुलनेत आपण आजही खूप पिछाडीवर आहोत. या देशांच्या कामगिरीशी बरोबरी करायची असेल तर या देशांमध्ये दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना प्रगतिपथावर आणण्यासाठी जी विशेष व्यवस्था उभारण्यात आली आहे त्याचा बारकाईने अभ्यास करून तशी कायमस्वरूपी व्यवस्था आपल्या देशात उभी राहणे गरजेचे आहे. दिव्यांगांना आपल्या दैनंदिन जीवनात आजही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सरकारे त्यासाठी धोरणे आखतात खरी पण ती बहुतांश वेळा कागदावरच राहतात, हाच सार्वत्रिक अनुभव आहे.

सार्वजनिक ठिकाणी रॅम्प उभारण्यापासून ते नोकरीत असणा-या अडीच टक्के राखीव जागांची भरती करण्यापर्यंत सर्वत्र असणा-या अनास्थेलाच दिव्यांगांना पावलोपावली सामोरे जावे लागते. दिव्यांगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का लागणार नाही, याची काळजीही नियोजनकर्त्यांनी घ्यायला हवी. तरच समाजाच्या दृष्टीतही सकारात्मक बदल होईल. दिव्यांगांना दया, सहानुभूतीची नव्हे तर प्रोत्साहनाची व सन्मानाने वागविण्याची गरज आहे तरच त्यांचे मनोबल वाढू शकते, आत्मविश्वास वाढू शकतो आणि सामान्यांसारखीच कामगिरी करण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण होऊ शकते. ज्यांना हे मिळाले त्यांनी देदीप्यमान कामगिरी सर्वच क्षेत्रांत करून दाखविली आहेच. त्यात खेळाच्या मैदानावरही शारीरिक कमतरतांवर मात करत देदीप्यमान कामगिरीची जी जिद्द भारतीय खेळाडूंनी दाखविली ती गौरवास्पदच आहे. या खेळाडूंनी नियमित ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी पडलेल्या निराशेवर आनंदाची, अभिमानाची व गौरवाची फुंकर घातली आहे.. जय हो!!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR