जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागमीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस होता. त्यांच्यासोबत त्यांच्या समर्थकांनीही सामूहिक उपोषण सुरू ठेवले आहे. त्यामुळे उपोषणस्थळी अनेकांची उपस्थिती आहे. दरम्यान, मनोज जरांगेंसह आणखी काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर जरांगे यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि त्यांना बळ द्यावे, असे आवाहन मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केले आहे.
जरांगे यांच्या आंदोलनाची सरकारने गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी. उद्याच्या उद्या शिष्टमंडळाने येऊन या ठिकाणी भेट दिली पाहिजे. त्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यामुळे सरकारने त्या मान्य कराव्यात, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
दरम्यान, धनंजय देशमुख हे मनोज जरांगे यांच्या उपोषणात सहभागी होणार आहेत. ते मनोज जरांगेंसोबत उपोषणासाठी बसणार आहेत. देशमुखांसोबत मस्साजोगचे ग्रामस्थही अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. धनंजय देशमुख दाखल होताच मनोज जरांगे उठून बसले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बोलता येत नाही.