जळकोट : प्रतिनिधी
पारा पाहता कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे. उन्हामुळे थंडगार टरबूज व खरबुजाला मागणी वाढली आहे. यासोबतच सध्या रमजान महिना सुरू आहे यामुळे मुस्लिम बांधव हे मोठ्या प्रमाणामध्ये उपवास सोडण्यासाठी टरबूज आणि खरबूज या फळांचा वापर करत आहेत .
सध्या जळकोट तालुक्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे यासोबतच बरोबर उन्हाळी हंगामामध्ये येणा-या टरबूज आणि खरबूज याची विक्रीही वाढलेली आहे.उन्हाळ्यामध्ये घामाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पाणी शरीराबाहेर जाते. शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यास याचा गंभीर परिणाम शरीराला होतो यामुळे नागरिकांची मागणी ही टरबूज या फळाकडे वाढलेली आहे. टरबूजामध्ये जास्ती प्रमाणात पाणी असते यामुळे शरीरातील पाण्याचे कमतरता भरून निघते या सोबतच शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्राप्त होते यामुळे नागरिकांचा कल हा टरबूजाकडे दिसून येत आहे . सध्या बाजारपेठेमध्ये टरबूज हे फळ मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले असून त्याची किंमतही आटोक्यात आहे.
जळकोट शहरातील आठवडी बाजारामध्ये दहा ते पंधरा रुपये किलो दराने टरबूज मिळत आहे. पंधरा दिवसापूर्वी हेच दर २५ रुपये किलो होते परंतु मोठ्या प्रमाणात टरबुजाचे उत्पन्न झाल्यामुळे टरबुजाचे दर घसरले आहेत . शेतकरी हे आपल्या स्वत:च्या वाहनांमध्ये टरबूज घेऊन बाजारपेठेमध्ये तसेच मोठ्या गावामध्ये विक्रीसाठी घेऊन येत आहेत . बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी बसलेल्या व्यापा-यापेक्षा स्वस्त दराने शेतकरी टरबूज विकत आहेत यामुळे अशा ठिकाणी नागरिक हे टरबूज खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.
टरबुजाचे भाव पडले असले तरीही शेतक-यांना त्याची विक्री केल्याशिवाय पर्याय नसतो कारण उन्हामुळे लवकर खराब होत असते यामुळे शेतकरी हे कमी किमतीत का होईना बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन येत आहेत . सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे दुपारच्या सुमारास नागरिक हे खाण्यासाठी टरबुजाचा वापर करत आहेत.