जळकोट : प्रतिनिधी
शहरांमध्ये थोडाही पाऊस झाला तरी जळकोट शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ असलेल्या रस्त्याला तलावाचे स्वरूप येत आहे. यामुळे नागरिकांना पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. शहरांमध्ये महात्मा फुले चौक ते आंबेडकर चौक हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे . जळकोट शहरातील मुख्य बाजारपेठेला जोडणारा हा रस्ता असल्यामुळे तसेच जळकोट शहरातील जुने गाव असलेल्या भागांमध्ये जाण्यासाठी हा रस्ता असल्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा रस्ता समजला जातो.
या रस्त्यावरूनच नागरिक ये-जा करीत असतात. या पाण्यातून गेल्याशिवाय नागरिकांना पर्याय उरत नाही परंतु नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे जळकोट येथील महात्मा फुले चौक ते डॉ .आंबेडकर चौक दरम्यान असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जवळ मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचून राहत आहे. विशेष म्हणजे जळकोट येथील जिल्हा परिषद शाळाही याच रस्त्याच्या बाजूला आहे. विद्यार्थ्यांनाही याच पाण्यातून शाळा गाठावी लागत आहे. या साठलेल्या पाण्यातून वाट काढताना प्रवाशांना तसे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
जळकोट शहरातील महात्मा फुले चौक ते आंबेडकर चौक दरम्यान असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ थांबत असलेल्या पाण्यासंदर्भात नगरपंचायतीने उपाययोजना करावी अशी मागणी जळकोट शहरातील नागरिकांनी केली आहे. जळकोट शहरांमध्ये प्रवेश करायचा झाल्यास महात्मा फुले चौकातूनच प्रवेश करावा लागतो. जळकोट शहरांमध्ये थोडा जरी पाऊस झाला तरी शहरातील जिल्हा परिषद प्रशालेजवळ मोठ्या पाण्याचा डोह जमा होत आहे. जळकोट शहरामध्ये प्रवेश करणा-या नागरिकांना या पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे.