लातूर : प्रतिनिधी
येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले. विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय मुख्य इमारतीचे तसेच मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहाचे विस्तारीकरण व इतर भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांच्या पुढाकारातून मंत्रालयात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर महाविद्यालयात कृषी जैवतंत्रज्ञान या विषयामधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जात असून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पाचव्या अधिष्टाता समितीच्या शिफारसीनुसार बी. टेक (जैवतंत्रज्ञान) विद्यार्थी प्रवेश क्षमतेमध्ये वाढ झाल्यामुळे उपलब्ध असलेली वसतिगृह सुविधा अपुरी पडत असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. सदर महाविद्यालयाची मुख्य इमारत विस्तारीकरण व मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहाचा विस्तार करून याठिकाणी त्वरित भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी बैठकीत केली.
आमदार सतीश चव्हाण यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करुन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सदरील महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहासाठी तातडीने दोन कोटी निधी मंजूर करुन देण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना दिले. तसेच पुढील बजेटमध्ये सदरील महाविद्यालयाच्या मुख्य इमारत विस्तारीकरण व मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहाचा विस्तार व याठिकाणी सुसज्ज अशा भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वास्त केले. या बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव, आ.रमेश कराड, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, कृषी परिषद, कृषी विद्यापीठ, मंत्रालयातील सबंधित अधिकारी, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आदींची उपस्थिती होती.