25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरज्ञान हाच भारतीय जीवनाचा मुलाधार

ज्ञान हाच भारतीय जीवनाचा मुलाधार

लातूर : प्रतिनिधी
अगदी पूर्वीपासून ज्ञान हाच भारतीय जीवनाचा मूळ आधार राहिलेला आहे. पाश्चात्यांच्या अनुकरणामुळे हे ज्ञान आज अव्यवस्थित झाले आहे.जागतिक वर्तमान परिस्थितीत भारताला ज्ञाननिष्ठ देश बनविण्यासाठी शास्त्रांचे मूळ सिद्धांत सर्वांसमोर आणले पाहिजेत, असे प्रतिपादन पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती श्रीमती इंदुताई काटदरे यांनी केले.
कर्णावती येथील पुनरुत्थान विद्यापीठाच्या वतीने हरंगुळ येथील जनकल्याण विद्यालयात अखिल भारतीय विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन करताना श्रीमती इंदुताई काटदरे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गुलबर्गा येथील बसवराज पाटील तर व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी, देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक अनिल भालेराव, परिषदेचे संयोजक संदीप रांकावत यांची उपस्थिती होती.
   उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना श्रीमती काटदरे म्हणाल्या की, पूर्वी भारतीय ज्ञान व्यवस्थित होते परंतु आज ते अव्यवस्थित झालेले आहे. ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी तीन टप्प्यात काम करावे लागणार आहे. अवस्थितपासून व्यवस्थिती, अनुवस्थिती ते  व्यवस्थिती व अव्यवस्थितीपासून व्यवस्थितीपर्यंत आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. भारतीयांनी आपले जीवन ज्ञाननिष्ठ बनवलेले आहे. इतर देशांच्या दृष्टीने भारतीय निरक्षर असतील परंतु ते अज्ञानी नाहीत. ज्ञानाचे प्रथम प्रकटीकरण अनुभूतीजन्य असते, असे त्या म्हणाल्या.
अध्यक्षीय समारोपात बसवराज पाटील यांनी ज्ञान या शब्दाचीच हत्या झाली असल्याचे मत व्यक्त केले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.  संयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दुस-या सत्रात ‘राष्ट्रीय शिक्षा हेतू किये गये प्रयास और उनके परिणाम’ यावर राकेश मिश्रा यांनी विचार मांडले. या सत्राचे संचलन नियती सप्रे यांनी केले. श्रीराम देशपांडे यांनी उपस्थित मान्यवरांचा ग्रंथ भेट देऊन सन्मान केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR