लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पूणे अंतर्गत शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ च्या अनुशंगाने परिरक्षक, सहाय्यक परिरक्षक, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व समवेक्षक यांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षण वर्गास ४७५ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणास शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी मार्गदर्शन केले. उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी प्रास्ताविक केले. यात प्रशिक्षणास परिक्षा प्रक्रीयेत असण-या ४७५ अधिकारी व कर्मचारी यांना सतीष भापकर यांनी परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षेसंदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याध्याता, गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.
शिक्षक पात्रता परीक्षा जिल्हास्तरावरील ३१ केंद्रांच्या ठिकाणी दि. १० नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असून पेपर-१ सकाळ सत्रात १०.३० ते १ वेळेत घेण्यात येणार असून ८ हजार १५६ सहभागी परीक्षार्थीसाठी २३ केंद्रांच्या ठिकाणी तसेच पेपर-२ दुपार सत्रात वेळ २.३० ते ५ सहभागी ९ हजार ९९३ परीक्षार्थीसाठी ३१ केंद्राच्या ठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षक पात्रत परीक्षेसाठी उपस्थित रहाणा-या परीक्षार्थी यांनी आपल्यासोबत प्रवेशपत्र, बॉलपेन काळा, निळा व आपले ओळखपत्र, सोबत ठेवणे अत्यावश्यक आहे. परीक्षेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही साहित्य आपल्यासोबत आढळून आल्यास परीक्षार्थींवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या.