नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोच्या क्रेटला एक हजार ३१ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला आहे. यामुळे टोमॅटोची लाली पुन्हा चकाकली आहे. आजच्या भावाने पंचवीस वर्षांतील सर्वकालीन उंची गाठली. घटलेली आवक व वाढती मागणी यामुळे टोमॅटोचे दर सोन्याप्रमाणे उजळले आहेत. टोमॅटोने शेतक-यांना यंदा मालामाल केले आहे.
दीड महिन्यापासून सुरू झालेल्या टोमॅटोच्या हंगामात पाचशे रुपये प्रतिक्रेटच्या खाली दर आले नाहीत. मुळात लागवड कमी, त्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा टोमॅटोच्या पिकाला फटका बसला. त्यामुळे पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोची आवक पन्नास हजार क्रेटवर आली आहे. सोमवारी पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो विक्रीसाठी येताच परराज्यातील आलेली मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापा-यांमध्ये मोठी चढाओढ लागली.
टोमॅटोसाठी स्पर्धा झाल्याने वीस किलो टोमॅटोच्या क्रेटला तब्बल एक हजार ३१ रुपये भाव मिळाला. तर सरासरी ८८१ रुपये दराने टोमॅटोची विक्री झाली. शेतक-यांना आकर्षक दर मिळाल्याने पिंपळगाव शहरातील बाजारपेठेतील उलाढाल वाढली.