28.6 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeलातूरडॉ. प्रभा अत्रे यांचे होते लातूरशी स्नेहबंध

डॉ. प्रभा अत्रे यांचे होते लातूरशी स्नेहबंध

लातूर : एजाज शेख 
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त लातूरला येऊन धडकले आणि लातूरकरांच्या डॉ. प्रभा अत्रे यांच्या विषयीच्या आठवणी एकदम जाग्या झाल्या. डॉ. प्रभा अत्रे यांचा लातूरकरांशी खुप जुना स्नेहबंध होता. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या हस्ते तब्बल ३२ वर्षांपूर्वी डॉ. प्रभा अत्रे यांना ‘संगीतरत्न’पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. प्रभाताई यांच्या निधनाने शास्त्रीय संगीत क्षेत्रात खुप मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना लातूरकर रसिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
डॉ. प्रभा अत्रे सन १९९० मध्ये सर्व प्रथम उदगीरला आल्या होत्या. रुपवेद कला संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. प्रभा अत्रे यांचे सुर ऐकायला मिळाले होते. या कार्यक्रमात डॉ. प्रभा अत्रे यांना लातूरचे सुरमणी बाबुराव बोरगावकर यांनी संवादिनीवर तर तालमणी डॉ. राम बोरगावकर यांनी तबल्याची साथ-संगत केली होती. त्यानंतर १९९२ साली लातूरमधील तत्काळी अस्तित्वात असलेल्या बसवेश्वर मंगल कार्यालयात मराठवाडा संगीत कला अकादमी व सरस्वती संगीत महाविद्यालयाच्या उद्घाटन समारंभास डॉ. प्रभा अत्रे आल्या होत्या. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या हस्ते मराठवाडा संगीत कला अकादमी व सरस्वती संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन झाले होते. याच कार्यक्रमात विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या हस्ते डॉ. प्रभा अत्रे यांच्या ‘संगीतरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. यावेळी संगीत महर्षी बाबा बोरगावकर, सुरमणी पंडित बाबुराव बोरगावकर, तालमणी डॉ. राम बोरगावकर व संगीत क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
‘किराणा’ घराण्याच्या गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी या कार्यक्रमात ‘जागु मैं सारी नयना…’, ‘तन मन धन…’ या बंदिशी व ‘कल नही आवे… हा बडाख्याल’ गायला आणि ही बंदीश अजरामर झाली. सुर, ताल, सरगम, रागदारी, शब्द आणि सुरांचा समन्वय अतिउत्तम असलेल्या डॉ. प्रभा अत्रे यांनी या कार्यक्रमात लातूरकरांची मने जिंकली.  शास्त्रीय संगीताची विशेष आवड असलेले विकासरत्न विलासराव देशमुख यांनी यावेळी डॉ. प्रभा अत्रे यांना दिलेली दाद आजही नेत्रपटला समोर जशीच्या तशी उभी राहाते. डॉ. प्रभा अत्रे यांनी स्वत: राग निर्मिती केली. किराणा घराण्याची गायकी लोकप्रिय करण्यात डॉ. प्रभा अत्रे यांचे सर्वाधिक योगदान आहे. त्यांच्या गायनाने नव्या पिढीतल्या कलावंतांना दिशा मिळाली आणि लातूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शास्त्रीय संगीत क्षेत्रात उद्योन्मूख कलावंत आले.
प्रभाताईंची गायकी अतिश्य भावनाप्रधान होती 
पद्मविभूषण विख्यात गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली असून कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.  अतिशय प्रतिभा संपन्न व सृजनशील अशी त्यांची गायकी होती. प्रत्येक मैफिलीमध्ये त्यांची प्रतिभा विविध रुपाने खुलत असे त्यांची गायकी व माणुसकी अतिशय भावनाप्रधान होती. इतकी मोठी कीर्ती मिळूनही त्यांनी कधी साधेपणा सोडला नाही. नवोदित कलावंतांना प्रोत्साहन देण्याची त्यांची वृत्ती होती, असे डॉ. राम बोरगावकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR