ढोकी : प्रतिनिधी
भैरवनाथ उद्योग समूह संचलित, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड तेरणा नगर या कारखान्यामार्फत तेरणा परिवार सभासद व ऊस उत्पादक शेतकरी स्नेह-संवाद मेळावा मंगळवारी (दि.२४) सकाळी १० वाजता तेरणा नगर ढोकी येथे आयोजित करण्यात आला आहे. या संवाद मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉ. तानाजी सावंत, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भैरवनाथ उद्योग समूहाचे चेअरमन शिवाजी सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व ऊस विकास या विषयावर डॉ. संजीव माने, झुबर पिंपळकर हे ऊस उत्पादक व सभासद यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याची कारखाना ठिकाणी जय्यत तयारी सुरु आहे.
भैरवनाथ शुगर संचलित, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सभासद ऊस उत्पादक शेतकरी स्नेह-संवाद मेळाव्याची जोरदार तयारी होत आहे. या संवाद मेळाव्याला उपस्थित शेतक-यांसाठी पावसापासून सुरक्षिततेसाठी वाटरप्रुफ मंडप उभारणी करण्यात येत आहे. तसेच परिसर स्वच्छता, वाहन पार्किंग, भोजन, बैठक व्यवस्था कारखाना सभासद, ढोकी व परिसरातील नागरिकांना निमंत्रीत यांना निमंत्रण प्रत्रिका जबाबदारीने त्यांच्या गावात जाऊन देण्यात येत आहेत.
व्यवस्थाचे चोख नियोजन कार्यकारी संचालक केशव सावंत हे करत आहेत. या मेळाव्यास लातूर, कळंब, धाराशिव तीन तालुक्यातील सभासद उपस्थित राहणार असून या कारखान्याला तीन तालुक्यातील जवळपास १७० गावातील शेतकरी, सभासद नागरिक हजेरी लावणार आहेत.तरी या स्नेह-संवाद मेळाव्याला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक केशव सावंत व तेरणा बचाव संघर्ष समिती यांनी केलेले आहे.