प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचे निधन
सॅन फ्रॅन्सिस्को : वृत्तसंस्था
ज्येष्ठ तबलावादक आणि शास्त्रीय संगीतकार झाकीर हुसेन यांचे रविवारी रात्री अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को येथे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसेन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
झाकीर हुसेन यांना हृदयविकार होता. गेल्या आठवड्यातही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १५ डिसेंबर रोजी पुन्हा त्यांची तब्येत बिघडली. त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने तबल्याचे हे सूर शांत झाले. त्याच्या निधनाच्या बातमीने भारतीय संगीतविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
झाकीर हुसैन हे प्रसिद्ध दिवंगत तबला संगीतकार अल्लाह राखा खान यांचा मुलगा आहे. अनेक प्रसिद्ध भारतीय आणि परदेशी चित्रपटांसाठी त्यांनी तबला वाजवला आहे. झाकीर हुसैन यांनी वयाच्या ७ व्या वर्षी तबला शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या १२ व्या वर्षी देशभरात फिरताना त्यांनी परफॉर्म करण्यास सुरुवात केली. सुमारे चार दशकांपूर्वी उस्ताद झाकीर हुसैन संपूर्ण कुटुंबासह अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे स्थायिक झाले. झाकीर हुसैन यांना देश-विदेशातील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
विविध पुरस्कारांनी सन्मानित
भारत सरकारने १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण, २०२३ मध्ये पद्मविभूषण यासारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. झाकीर हुसैन यांना १९९० मध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कारही मिळाला होता. २००९ मध्ये ५१ व्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उस्ताद झाकीर हुसैन यांना त्यांच्या कारकिर्दीत ७ वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, त्यापैकी त्यांना चार वेळा हा पुरस्कार मिळाला.