नवी दिल्ली : प्रतिनिधी
खराब रस्त्यांवर देखील प्रवाशांना टोल भरावा लागतो. यावरून प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळते. आता याच मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची टिप्पणी केली. ते म्हणाले की, जर चांगले रस्ते आणि सेवा दिली जात नसेल तर टोल टॅक्स वसूल करणे चुकीचे आहे.
नितीन गडकरी यांनी टोल नाक्यावर लागणा-या रांगांबाबत च्ािंता व्यक्त केली. सॅटेलाईट बेस्ड टोलिंगवर आयोजित वर्कशॉपच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते टोल टॅक्सबाबत मोकळेपणाने बोलल्याचे पाहायला मिळाले. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे नव्या व्यवस्थेअंतर्गत टोल गेट्स हटवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
जर चांगल्या सुविधा दिल्या जात नसतील तर त्यांनी टोल आकारला नाही पाहिजे. जेव्हा कोणत्या रस्त्याची स्थिती चांगली नसते तेव्हा मला त्याच्या तक्रारी मिळत असतात. अनेक जण सोशल मिडियावर मला टॅग करून यासंदर्भात कळवत असतात, असे नितीन गडकरी म्हणाले.
ज्या ठिकाणी खूप चांगले रस्ते बनत आहेत, त्याठिकाणी प्रवाशांनी शुल्क द्यायला हवा. जर तुम्ही खड्डे आणि चिखलाच्या रस्त्यासाठी देखील पैसे आकारत असाल तर चुकीचे आहे. तुम्ही असे करत असाल तर लोक नक्कीच नाराज होतील आणि त्यांच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागेल, असे नितीन गडकरी म्हणाले.