निलंगा : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यात वाळू माफीयाची मुजोरी वाढली असून सदर वाळू माफीयाविरुध्द जोरदार मोहीम तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सुरु केली आहे. वाळू माफीयाविरध्द कार्यवाही करण्यासाठी विविध पथके स्थापन केली. होसूर सज्जाचे तलाठ्यास माफीयाने शिबीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
वाळूमाफीयावर कारवाई करण्यासाठी पथके दिवसरात्र फिरुन अवैध उत्खनन व वाहतूकीविरुध्द कार्यवाही करीत आहेत. अशाच एका प्रकरणी होसूर ते चिंचोंडी रोडवर खंडू उत्तम शामगीरे हे ट्रॅक्टर क्रमांक एच-२४ ५६ व्दारे अवैध वाहतूक करीत असताना चौकशी केली असता होसूर सज्जाचे तलाठी कांबळे राजू यांनी सदर ट्रॅक्टर ट्रॅक्टर तहसील कार्यालय निलंगा येथे लावण्यास सांगीतले असता ट्रॅक्टर मालक खंडू उत्तम शामगीरे रा.चिचोंडी याने सदर तलाठ्यास
शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देऊन ट्रॅक्टरमधील वाळू खाली टाकून पळून गेला आहे.
या बाबत तलाठी कांबळे राजू पुंडलिकराव यांनी संबंधितावर औराद पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविल्यानुसार त्यांच्याविरुध्द भादंस १८६० मधील कलम ३५३,३७९,५०४,५०६ व गौणखनिज अधिनियम २०१३ चे कलम ४८ (७) (८) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक चौकशी औराद ठाण्याचे सपोनी विठ्ठल दूरपडे हे करीत आहेत. तसेच दुस-या एका प्रकरणात कर्नाटक राज्यातून वाहतूक करुन कासारशिरसी (ता.निलंगा) येथे अवैध वाळू टाकून उभ्या असलेल्या टीप्पर क्र. के.ए.५६-८४३९ ची चौकशी केली असता ड्रायव्हर सिध्दू नागया स्वामी रा. बसवकल्याण यांचेकडे सदर वाळूबाबत कसलाही परवाना आढळून आला नाही. त्यामुळे संबंधिताविरुध्द भादंस १८६०चे कलम ३७९,३४ व गौणखनिज अधिनियम २०१३ चे कलम ४८ (७) (८) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक चौकशी पोलीस ठाण्याचे सपोनी शेख हे करीत आहेत.