26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रतानाजी सावंत यांना बडतर्फ करा

तानाजी सावंत यांना बडतर्फ करा

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ‘सामना’च्या ‘रोखठोक’ या अग्रलेखातून जळजळीत टीका केली आहे. राज्यातील मुख्यमंत्र्यांना तापाने फणफणलेल्या मुलांच्या मातांना भेटण्यासाठी वेळ नाही.

या मुलांना लसी न मिळाल्याने अनेक मृत्यू झाले आहेत, असे सांगताना राऊत यांनी महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्था नसून त्याचा निधी इतर विभागांना आणि योजनांना वळवण्यात आला असल्याचा आरोप केला. यासोबतच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना ताबडतोब बडतर्फ करावे व सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करावा असे टीकास्त्र ही राऊत यांनी सत्ताधा-यांवर सोडले.

दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मलबार हिलच्या ‘सह्याद्र्री’ अतिथीगृहावर जे घडले ते चित्र महाराष्ट्राला काळिमा फासणारे आहे. तापाने (मेंदुज्वर) फणफणलेल्या मुलांना घेऊन असंख्य माता ‘सह्याद्री’ अतिथीगृहाबाहेर पोहोचल्या होत्या. त्या मुलांना ‘सह्याद्री’अतिथीगृहाच्या बाहेर रस्त्यावर ठेवून माता आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्यावेळी ‘सह्याद्री’त देशाचे गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री शिंदे यांच्यात राजकीय बैठक सुरू होती व त्या मातांना मुख्यमंत्र्यांना भेटायचे होते.

मात्र, त्यांना पायरीवरच रोखले गेले. मोठे रस्ते बांधताय, पुतळे उभारताय, मेट्रो आणि बुलेट ट्रेन आणताय, विकासाच्या गप्पा मारताय, पण आमच्या मुलांच्या तापावर धड इलाज होत नाहीत. त्यांना लस मिळत नाही, अशी वेदना ‘सह्याद्री’च्या बाहेर एका मातेने मांडली. ती वेदना अस्वस्थ करणारी आहे. निवडणूक कार्यात गुंतलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांना या वेदनेची दखल घ्यावी असे वाटले नाही. मुलांपेक्षा त्यांना गायी महत्त्वाच्या वाटल्या, असा टोला संजय राऊत यांनी या लेखातून लगावला आहे.

गायींना वाचविण्यासाठी पैसे

दरम्यान, सरकारने आता गायींना राज्यमातांचा दर्जा दिला. गायी जगवण्यासाठी निधी मंजूर केला. लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपयांची मदत सुरू केली. आरोग्य खात्यापासून शिक्षणापर्यंतचा सर्व निधी लाडक्या बहिणी व गायींच्या संवर्धनासाठी वळवला. त्यामुळे महाराष्ट्राचे आरोग्य व्यवस्थेचे स्मशान झाले व तापाने फणफणलेल्या मुलांना घेऊन माता-भगिनी ‘सह्याद्री’च्या बाहेर उभ्या ठाकल्या. ‘सह्याद्री’बाहेर तापाने फणफणलेल्या मुलांकडे सरकारने लक्ष दिले नाही. कारण सरकार भ्रष्टाचारात व राजकारणात गुंतून पडले आहे, असा आरोपही राऊत यांनी सत्ताधा-यांवर केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR