28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयदंतेवाडा-विजापूर सीमेवर नक्षलवाद्यांशी जवानांची चकमक, ९ नक्षलवादी ठार

दंतेवाडा-विजापूर सीमेवर नक्षलवाद्यांशी जवानांची चकमक, ९ नक्षलवादी ठार

दंतेवाडा : छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. दंतेवाडा आणि विजापूर सीमेवर झालेल्या या चकमकीत सुरक्षा दलांनी नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम बस्तर विभागात काही नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, आज सकाळी १०.३०च्या सुमारास पीएलजीए कंपनी क्रमांक २ च्या नक्षलवाद्यांशी पोलिस दलाची चकमक झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. ज्यामध्ये सुरक्षा दलांनी नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.

सुरक्षा दलांनी ठार केलेल्या नक्षलवाद्यांच्या मृतदेहाजवळून एसएलआर ३०३ आणि १२ बोअरची शस्त्रे जप्त केली आहेत. नक्षलग्रस्त राज्य म्हणून ओळखले जाणा-या छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये नेहमी चकमकी होतात. या वर्षी मे महिन्यातही विजापूरमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. ज्यामध्ये १२ नक्षलवादी मारले गेले होते. मात्र, याच काळात माओवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात दोन सुरक्षा कर्मचारीही जखमी झाले आहेत. याशिवाय एप्रिलमध्येही छत्तीसगडमध्ये अनेक नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले होते. त्यानंतर कांकेर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी २९ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.

जुलैमध्ये दोन जवान झाले होते शहीद
दरम्यान, या वर्षी जुलैमध्ये नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील विजापूरच्या जंगलात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी आयईडी पेरली होती. त्यामुळे दोन जवान शहीद झाले होते. या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात चार जवानही जखमी झाले आहेत. सुरक्षा दल ऑपरेशन करून परतत असताना नक्षलवाद्यांनी पाईप बॉम्बचा स्फोट केला. ज्यात एसटीएफचे कॉन्स्टेबल भरतलाल साहू आणि कॉन्स्टेबल सतेरसिंग शहीद झाले. तर पुरुषोत्तम नाग, कोमल यादव, सियाराम सोरी आणि संजय कुमार जखमी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR