22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडादक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा शानदार विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा शानदार विजय

डरबन : वृत्तसंस्था
संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर भारताने २०२ धावांचा डोंगर उभारला होता. भारताने दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीला एकामागून एक तीन धक्के दिले. पण त्यानंतर डेव्हिड मिलर आणि हेन्रीच क्लासिन यांच्यात चांगली भागीदारी पाहायला मिळाली. त्यामुळे भारतीय संघ पराभवाच्या छायेत आल्याचे पाहायला मिळत होते. पण वरुण चक्रवर्तीने या दोघांनाही बाद केले आणि तिथेच भारताने हा सामना जिंकला.

या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ६१ धावांनी मात केली. भारताला तब्बल २७ दिवसानंतर हा विजय मिळू शकला. यापूर्वी भारताला विजय बांगलादेशबरोबरच्या तिस-या टी २० सामन्यात झाला होता. हा सामना १२ ऑक्टोबरला झाला होता. त्यामुळे २७ दिवसांनी भारताला पुन्हा एकदा विजयपथावर पोहोचता आले.

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. कारण संजू सॅमसनच्या तुफानापुढे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना लोटांगण घालायला लागले. संजूने फक्त चांगली सुरुवातच करून दिली नाही तर सातत्याने तो दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीवर प्रहार करत राहिला. केशव महाराजच्या गोलंदाजीवर संजूने मारलेला फटका हा नरजेचे पारणे फेडणारा होता. संजू त्यानंतरही थांबला नाही. सलग दोन षटकार लगावले आणि संजूने आपले अर्धशतक पूर्ण केले. पुन्हा एकदा संजू भारतासाठी नायकाची भूमिका बजावत होता. कारण संजूला वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही.

संजूने त्यानंतर सहजपणे शतकाच्या दिशेने कूच केले. संजू नव्वदीत कधी आला, हे कोणालाही समजले नाही. कारण संजूची फलंदाजी ही एवढी शिस्तप्रिय होती की, चाहते त्याच्या फलंदाजीत हरवून गेले होते. संजूने यावेळी फक्त आक्रमक फटके मारले नाहीत तर त्याच्या फटक्यांमध्ये नजाकतही होती. संजूने एकेरी धाव घेत ४७ व्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. संजूचे हे सलग दुसरे टी २० शतक ठरले. भारताकडून टी २० क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकावणारा संजू हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. संजू यावेळी १०७ धावांवर बाद झाला. संजूनंतर भारताचा एकही खेळाडू मोठी फटकेबाजी करू शकला नाही आणि भारताला २०२ धावा करता आल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR