छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू असतानाच रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची विमानतळावर भेट झाली. दोघांनीही एकमेकांच्या जवळ जाऊन चौकशी केली, भेट घेत फोटो देखील काढले. रावसाहेब दानवे यांना आपण लोकसभेत पाडल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले होते. तर अब्दुल सत्तारांनाही पाडणार असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. मात्र याच दरम्यान अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांची भेट झाली, दोन्ही नेत्यांनी एकत्र येत फोटो देखील काढले, त्यामुळे आता चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारल्याचे पाहायला मिळाले तर दुसरीकडे मात्र महायुतीला राज्यात मोठा फटका बसला. अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, यामध्ये रावसाहेब दानवे यांचा देखील समावेश आहे.
दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या पराभवानंतर दानवे आणि शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण चांगलेच रंगले. आपला पराभव हा सत्तारांमुळे झाल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला होता. त्यानंतर दानवे यांच्या या आरोपाला उत्तर देताना आपणच दानवेंना लोकसभेत पाडल्याचे सत्तार यांनी म्हटले होते.
राज्यात महायुतीला धक्का
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला, अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. त्यामध्ये रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, भारती पवार अशा अनेक उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे. तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्याचे पाहायला मिळाले.