जालना : प्रतिनिधी
मराठवाड्यातील धक्कादायक निकालांपैकी एक असलेल्या लोकसभेच्या जालना मतदारसंघात सलग पाच वेळा निवडून आलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर दानवे यांच्या भोकरदनमध्ये ‘स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा’ अशा आशयाच्या लागेल्या एका बॅनरची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसते आहे.
हे बॅनर भोकरदन शहरातील प्रमुख चौकात लावण्यात आले असून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांनी ते लावले आहे. महाविकास आघाडीचे डॉ. कल्याण काळे यांना विजयाच्या शुभेच्छा देणारे हे बॅनर असले तरी यावर नमूद करण्यात आलेल्या मजकुरातून रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
कल्याण काळे यांना विजयाच्या शुभेच्छा देतानाच या बॅनरवर भोकरदन-जाफ्राबाद तालुक्यातील तमाम जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, असा टोला लगावण्यात आला आहे. सध्या या बॅनरची तालुक्यात चांगलीच चर्चा होताना दिसते आहे.
शेतक-यांच्या कापसाला, सोयाबीनला भाव नाही, असा आरोप करत राहुल देशमुख यांनी हा विकसित भारत रथ भोकरदन तालुक्यात रोखत त्यावर कापूस फेकत भाजप सरकारचा निषेध केला होता. याशिवाय याच रथावरील बॅनरवर करण्यात आलेल्या मोदी सरकार या शब्दातील मोदी नावावर भारत असा उल्लेख करणारे स्टीकर चिटकवले होते.
सलग सहाव्यांदा लोकसभेची निवडणूक लढवणा-या रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी तब्बल १ लाख ९ हजार मतांनी पराभव केला.