नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीत आप सरकारच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आतिशी यांचे सामान त्यांच्या शासकीय निवासस्थानातून बाहेर काढण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी त्या या निवासस्थानी राहण्यास आल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचे घर सील केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांच्या पथकाने बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास फ्लॅगस्टाफ रोड, सिव्हिल लाईन्स येथील शीश महल या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि चाव्या ताब्यात घेतल्या.
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर तीन आठवड्यांनी शीश महल रिकामे करण्यात आले. मधल्या काळात आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आतिशी या शासकीय निवासस्थानी स्थलांतरीत होणार होत्या. परंतु त्यांच्याकडे याबाबतचे अधिकृत पत्र नव्हते. दिल्लीत मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून कोणतेही ठराविक निवासस्थान नाही. ६, सिव्हिल लाईन्समधील फ्लॅगस्टाफ रोड येथील निवासस्थानी केजरीवाल २०१५ पासून राहत आहेत. २०२०-२१ मध्ये घराची पुनर्बांधणी करण्यात आली होती. या शीश महलसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आल्याने अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकाही करण्यात आली होती.