22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसोलापूरदूध पंढरीवर ५० कोटी कर्जाचा डोंगर

दूध पंढरीवर ५० कोटी कर्जाचा डोंगर

पंढरपूर-
शेतकरी संघटनेचे दिवगंत नेते वसंतराव आपटे व त्यांच्या सहका-यांनी सायकलवर फिरून दूध उत्पादकांना एकत्र करीत पै-पै जमा करून १९८२ मध्ये स्थापन केलेल्या दूध पंढरी अर्थात सोलापूर जिला दूध उत्पादक संघाला घरघर लागली.

दैनंदिन ४ लाखांहून अधिक दूध संकलन असणाऱ्या व १ हजार ८०० कर्मचारी असा भरभराटीला आलेल्या, दूध पंढरीच्या मालकीच्या असणाऱ्या जिल्ह्यातील विविध तालुक्यात असणाऱ्या ८ पैकी ७ दूध शितकरण कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय अध्यक्ष रणजितसिंह शिंदे व संचालक मंडळाने घेतला असून या संचालक मंडळाच्या मनमानी कारभारा विरोधात सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघ बचाव कृती समिती मैदानात उतरली .

संघाच्या अधोगतीला जबाबदार असणारे संचालक मंडळ बरखास्त करून दूध संघावर प्रशासक नेमणूक करा अशी मागणी समितीचे अध्यक्ष अनिल आवताडे व उपाध्यक्ष भाऊसाहेब पावणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुपाला घामाचा दाम मिळावा या उदात्त हेतूने शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते वसंतराव आपटे, भगवान कसाण व इतर सहकार्‍यांनी १९८२ मध्ये दूध पंढरीची स्थापना केली. गावोगावी सायकल वरून फिरून शेतकऱ्यांना संघास दूध देण्यासाठी प्रोत्साहित केले. आणि संघ भरभराटीस आणला. संघाचे दैनंदिन दूध संकलन ४ लाखांहून अधिक झाले. परंतु यासंघात राजकीय मंडळींचा हस्तक्षेप वाढला आणि संघ अधोगतीकडे जाऊ लागला. आता दूध संघाचे दैनंदिन संकलन अवघे ७-८ हजार असून कर्मचारीही फक्त 20 आहेत.तर त्या कर्मचाऱ्यांचा मागील १६ महिन्याचा पगार थकित असून दूध संघावर ५० कोटी रुपये कर्जाचा डोंगर उभा केला आहे. या कर्जापोटी दूध पंढरीच्या मालकीच्या मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जागा लाटण्याचा घाट घातला जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

जिल्हा दूध संघाने शेतकऱ्यांना गाई वाटप करण्यासाठी एचडीएफसी बँकेकडून २१ कोटी १७ लाख रुपये तर दूध बील देण्यासाठी ३ कोटी ५५१ लाख रुपये कर्ज घेतले होते.

परंतु विद्यमान चेअरमन व संचालक मंडळाने याचे हप्ते न भरल्यामुळे सदरचे कर्ज एनपीए मध्ये गेले, तर कर्मचाऱ्यांचा फंड व इतर हप्ते कट करत घेतले. परंतु सदर बँकेत ते भरले नाहीत, गंभीर बाब म्हणजे विद्यमान संचालक मंडळाने सोलापूर डिसीसी बँकेत असणाऱ्या रिझर्व्ह फंडातून १ कोटी २४ लाख कर्ज आणि ५० लाखाची सीसी काढून घेतली आहे तर माढ्यातील माढेश्वरी अर्बन बँकेचे कर्ज काढण्यासाठी १५ कोटीचे तारण बँकेला दिले आहे.

विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळात दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाची रक्कम प्रति १० दिवसात न मिळता तब्बल १ महिना विलंबाने मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपले पशुधन जगविणे जिकरीचे झाले आहे. या संचालक मंडळाचा हेतू शेतकरी हिताचा नसून दूध संघाच्या स्थावर मालमत्ता विक्री करून त्यामध्ये गैरव्यवहार करण्याचा आहे. विद्यमान अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी संघाच्या मालकीच्या टेंभुर्णी येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या जागेवर अनाधिकृतपणे बांधकाम करून सदरची जागा बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब प्रशासनाच्या अहवालात लिड झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे व जिल्हा दूध संघाच्या हितासाठी विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळ बरखास्त करून संघाचे कामकाज महानंद किंवा प्रामाणिक अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR