26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमुख्य बातम्यादूध पावडरला अनुदान, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात दर पडले

दूध पावडरला अनुदान, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात दर पडले

कोल्हापूर : वृत्तसंस्था
गायीची दूध पावडर निर्यात करणा-या दूध संघांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरी त्याला संघाकडून थंडा प्रतिसाद मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पावडरला मिळणारा दर व त्यात शासनाचे प्रतिकिलो ३० रुपयांचे अनुदान जरी गृहित धरले तरी पावडरचा उत्पादन आणि निर्यातीचा खर्च आणि तिथे मिळणारा दर पाहता ताळमेळ बसत नसल्याने बहुतांशी दूध संघांनी निर्यातीकडे पाठ फिरविली आहे.

पावडर निर्मितीसाठी शासन प्रतिलिटर दीड रुपया अनुदान देत असल्याने निर्यातीपेक्षा देशांतर्गत विक्रीवरच भर दिसत आहे. राज्यात गायीच्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न डिसेंबरपासून गंभीर बनत चालला आहे.

ऐन उन्हाळ्यात दूध कमी होण्यापेक्षा वाढल्याने दुधाचे करायचे काय? असा प्रश्न संघांपुढे होता. त्यातून खरेदी दर कमी केल्याने शेतकरी अडचणीत आले. त्यामुळे राज्य शासनाने जानेवारीपासून दोन महिन्यांसाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दिले. तरीही दुधाच्या दरात सुधारणा झाली नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही दर नसल्याने अडचणी वाढत गेल्या. संघांनी दूध पावडर करावी, यासाठी प्रतिलिटर दीड रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जे दूध संघ पावडरची निर्यात करणार आहेत, त्यांना प्रतिकिलो ३० रुपये अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान दि. १ जुलै ते २० सप्टेंबर या कालावधीसाठी राहणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR