छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याचा सस्पेन्स अखेर काल संपला. खरेतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होते, मात्र पक्षाने विधिमंडळ गटनेता निवडीसाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मुंबईत निरीक्षक म्हणून पाठवले आणि वेगळ्या चर्चांना उधाण आले.
मराठा, ओबीसी किंवा महिला मुख्यमंत्री होणार, भाजप धक्का देणार? अशा अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.
काल मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांच्या नावावर विधिमंडळ गटनेता निवडीच्या बैठकीत एकमत झाले आणि या चर्चेला पूर्णविराम मिळाला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत ही, अपेक्षा होती असे म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले. जनमताचा कौल देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर दिसून आला. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हीच अपेक्षा होती. भाजप विधिमंडळ पक्षाने सर्वानुमते त्यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली याचा आनंद व समाधान आहे.
मुख्यमंत्री म्हणून पुढील पाच वर्षे ते महाराष्ट्राला स्थिर सरकार देतील. ते लोकप्रिय आहेत, अनुभवी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला सक्षम सरकार आणि कार्यक्षम प्रशासन मिळेल, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये आणण्यात फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका होती.
पक्षात प्रवेश होताच राज्यसभेवर संधी आणि विधानसभा निवडणुकीत श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी देत फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना पक्षात झुकते माप दिल्याचे पहायला मिळाले. आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्या लेकीला पदार्पणात मंत्रिपद मिळते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.