अकोला : प्रतिनिधी
पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथून अकोल्याकडे येत असलेल्या एसटी महामंडळाच्या बसचे मागचे चाक अचानक निखळून दूरवर फेकले गेल्याची घटना सोमवारी (दि. २ सप्टेंबर) सकाळी ८ वाजताच्या सुमारास कळंबेश्वर गावानजीक घडली. चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच बस थांबवल्याने पुढील अनर्थ टळला व बसमधील ७० प्रवाशांचे प्राण वाचले.
दरम्यान, पिंपळखुटा येथे रात्रपाळीला मुक्कामी असलेली एम.एच. ४० एन. ८९४४ क्रमांकाची अकोला आगार क्र. १ ची बस सोमवारी सकाळी प्रवासी व विद्यार्थ्यांना घेऊन अकोल्याकडे मार्गस्थ झाली. कळंबेश्वरनजीक आली असता मागच्या बाजूच्या दोन चाकांपैकी एका चाकाचे नट-बोल्ट निखळले व चाक बाहेर निघून रस्त्यालगतच्या असलेल्या शेतात जवळपास ५० फूट अंतरावर जाऊन पडले.
यावेळी एक चाक सुस्थितीत असल्याने बस अपघातग्रस्त झाली नाही. हा प्रकार रस्त्याने जात असलेल्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत चालकाला सांगितले. चालकाने तातडीने बस थांबविली. त्यावेळी बसमध्ये सुमारे ७० प्रवासी असल्याची माहिती आहे. सर्व प्रवाशांना दुस-या बसद्वारे पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले.