लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात आठ तालुक्यातील ४१ गावात व ८ वाडयांना पाणी टंचाईच्या झळा जानवत आहेत. तहसिल स्तरावर आलेल्या प्रस्तावांची तपासणी करून सदर गावात पाणी टंचाई आहे का याची खात्री झाल्यानंतर प्रस्तावांना मंजूरी दिली जात आहे. उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा या गावातील नागरीकांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून अधिग्रहण मंजूर केले आहे. त्यामुळे नागरीकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे.
लातूर जिल्हयात गेल्यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने यावर्षी जानेवारीपासूनच जिल्हयात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून पाणी टंचाइचे प्रस्ताव पंचायत समितीच्याकडे येऊ लागले आहेत. जिल्हयातील ४१ गावांसाठी व ८ वाडया, तांडयावरील नागरीकांसाठी पाणी मिळावे म्हणून पंचायत समिती स्तरावर ५७ अधिग्रहाणाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. पंचायत समितीकडे दाखल झालेल्या प्रस्तावांची विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्या मार्फत सदर गावात पाणी टंचाई आहे का याची तपासणी करून प्रस्ताव तहसिल कार्यालयाकडे पाठवले जात आहेत.
पंचायत समिती स्तरावरून तहसिल कार्यालयाकडे १७ गावे ८ वाडयांसाठी २६ अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समित्यांनी तहसिलदार यांच्याकडे मंजूरीसाठी पाठवले होते. सदर प्रस्तावांची तहसिलदार यांच्या कार्यालयाकडून पाहणी करण्यात येत आहे. उदगीर तालुक्यातील धोंंडी हिप्परगा या गावातील नागरीकांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून अधिग्रहण मंजूर करण्यात आले आहे.