25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रनवनीत राणांना महायुतीतून बाहेर काढा

नवनीत राणांना महायुतीतून बाहेर काढा

अमरावती : प्रतिनिधी
राज्यपालपदाच्या नियुक्तीवरून महायुतीत चांगलीच खडाजंगी रंगली असताना आता अमरावती मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी आणखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नुकतीच महायुतीतील आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. सोबतच त्यांनी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यावरही निशाणा साधला. त्या पाठोपाठ आता शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ यांनीदेखील नवनीत राणा यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

माजी खासदार नवनीत राणा यांना आवरा अथवा महायुतीतून बाहेर काढा, किंबहुना आम्हाला वेगळा निर्णय घ्यायला भाग पाडू नका, असा थेट इशारा अभिजित अडसूळ यांनी महायुतीतील उच्चपदस्थ नेत्यांना दिला आहे. राणा दाम्पत्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडत आहे. आमचा स्वाभिमान दुखावला तर आम्हीही शिवसैनिक आहोत हे लक्षात घ्या, असेही अभिजित अडसूळ म्हणाले.

अपमान सहन केला जाणार नाही
पुढे बोलताना अभिजित अडसूळ म्हणाले की, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आम्ही दोन ते तीन वेळेस माघार घेतली आहे, तरी राज्यपालपद आनंदराव अडसूळ यांना का नाही? अमित शहा यांनी आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल करणार, असा शब्द मार्च महिन्यात दिला होता. मग या यादीमध्ये आनंदराव अडसूळ यांचे नाव का नाही? असा सवाल उपस्थित करत महायुतीत भाजपकडून आमच्यावर अन्याय झाला असल्याची खंत कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी नुकताच बोलताना व्यक्त केली होती.

राणा यांनीच केला घात
आमदार रवी राणा हे कायम वाचाळपणे बोलतात. राणा यांनीच त्यांच्या पत्नीचा घात करून त्यांना पाडले. जिल्ह्यातील एकाही नेत्यासोबत त्यांचे चांगले संबंध नाहीत. महायुतीत खडा टाकण्याचे काम रवी राणा करत आहेत. शिवसेनेच्या नेत्याबाबत अर्वाच्च भाषेत बोलणे योग्य नाही. खोटी प्रमाणपत्रं बनवून रवी राणा यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे जनतेनेही त्यांना जागा दाखवली. आनंदराव अडसूळ हे महायुतीचे नेते आहेत. आमच्या नेत्याबाबत अशी भाषा वापरली जात असेल तर युतीत रहायचं की नाही, हाही विचार आता आम्हाला करावा लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR