मागच्या आठवड्यामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्याचा परिणाम कोरोनानंतर ख-या अर्थाने मोठी पडझड शेअर बाजारात झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असणारा सेन्सेक्स तब्बल ४३७९अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५० मध्ये १३८९ अंकांची घसरण झाली. म्हणजेच दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ५.७४ व ५.९३ टक्क्यांनी घसरले. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ३१.०८ लाख कोटी रुपये बुडाले असल्याचे माध्यमांनी म्हटले होते. याचा अर्थ मार्केटचे मूल्यांकन तेवढे कमी झाले. यापूर्वी कोरोनाच्या काळात म्हणजे २३ मार्च २०२० ला सेन्सेक्स हा ३९३४ अंकांनी म्हणजेच १३.१५ टक्क्यांनी घसरला होता. त्यावेळेस एका दिवसात गुंतवणूकदारांना १४ लाख कोटींचा फटका बसला होता. शॉर्ट टर्मचा विचार करता अशा काळात अनेक ट्रेडर विशेषत: इंट्राडे वर्ग तोट्यात जातो. मागील पाच सार्वत्रिक निवडणुकीच्या काळातील अनुभव लक्षात घेता निकालादरम्यान बाजारात अस्थिरता निर्माण होतच असते. हा इतिहास सामान्य गुंतवणूकदार, ट्रेडर, वित्तीय संस्था, परकीय संस्था विसरल्याचे जाणवले. शेअर बाजारामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती सातत्याने होत असते हा नियम सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे असते.
येणा-या काळात एनडीएचे सरकार हे बहुपक्षीय सरकार असेल. भारतीय जनता पक्षाला २४२ जागा मिळाल्याने त्यांच्याकडे संपूर्ण बहुमत नसल्याने त्यांना घटक पक्षांवर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे निर्णय घेत असताना भाजपचा वरचष्मा राहणार नाही. आर्थिक निर्णय घेत असताना एनडीएतील इतर पक्षांच्या मताचा विचार घेऊन निर्णय घ्यावे लागतील. तथापि, बाजाराने तूर्त तरी या सरकारचे स्वागत केल्याचे सप्ताहाखेरीस आलेल्या तेजीने दाखवून दिले आहे.
मागील आठवड्यामध्ये शेअर बाजारामध्ये चढ-उतार ज्या मोठ्या स्वरूपामध्ये झाले, चालू आठवड्यामध्ये त्याची तीव्रता कमी होऊ शकेल. कारण आता नवीन सरकार स्थापन झालेले असणार आहे. मान्सूनची वाटचाल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीने रेपोदरात बदल न करण्याचा घेतलेला निर्णय, महागाईचे आकडे अशा अनेक घटनांचा परिणाम शेअर बाजारातील निर्देशांकावर होऊ शकेल. शेअर बाजाराला नवीन सरकारकडून ब-याचशा अपेक्षा आहेत. बाजाराचे लक्ष हे नवीन सरकारच्या धोरण पद्धतीवर आणि अंमलबजावणीवर आहे. बदलत्या परिस्थितीत प्रत्येक गुंतवणूकदारांनी आपापल्या पोर्टफोलिओमध्ये बदल करणे गरजेचे असते. नव्या सरकारकडून इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून सकारात्मक धोरण ख-या अर्थाने मिळते काय? याचा फोकस काय असेल? या सर्व बाबींचा विचार गुंतवणूकदारांच्या निर्णयप्रक्रियेमध्ये असू शकतो. साहजिकच याचा परिणाम शेअर बाजारावर होऊ शकेल.
नव्या सरकारला विकसित भारत ही संकल्पना राबवायची असेल तर लोकसंख्या, डिजिटललायझेशन व एआयचा फायदा ख-या अर्थाने उचलता येतो का याकडे बाजाराचे लक्ष असेल. असे झाल्यास नवीन गुंतवणूक भारतामध्ये येऊ शकेल. नवीन सरकारने आर्थिक धोरण स्वीकारताना ते दीर्घकालीन कसे असेल याचा विचार करणे गरजेचे ठरते. त्यातून शेअर बाजारामध्ये पायाभूत स्थिरता येऊ शकेल. त्यादृष्टीने गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ हा सर्वसमावेशक असणे गरजेचे ठरेल. जेणेकरून पॅनिक सेलिंग टाळले जाईल. येणा-या काळामध्ये नवीन सरकारपुढे अनेक आव्हाने नक्कीच आहेत. यामध्ये आर्थिक वृद्धी कायम ठेवणे, बेरोजगारी दर कमी करणे, जीडीपीचा दर वाढविणे, आयात आणि निर्यातीचे धोरण, कृषी धोरण इत्यादी घटकांचा गांभीर्याने विचार नवीन सरकारला करावा लागेल. त्यामध्ये सर्वसमावेशकता असल्यास शेअर बाजारामध्ये ख-या अर्थाने तेजी ही दीर्घकालीन असू शकेल.
मागील आठवड्यामध्ये नवीन सरकारमध्ये तेलगू देसम पार्टी व नितीश कुमारांचा संयुक्त जनता दल यांचे स्थान भक्कम होणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे आंध्रामधील हेरिटेज फुड आणि अमर राजा या दोन कंपन्यांच्या समभागांमध्ये जवळपास ३० टक्के तेजी दिसली. अमर राजाचे एमडी हे तेलगू देसम पार्टीशी निगडित असल्याचे समजते. हेरिटेज ग्रुपची स्थापना १९९२ मध्ये चंद्राबाबू नायडू यांनी केली होती. हा उद्योगसमूह डेअरी, रिटेल आणि अॅग्रिकल्चर या क्षेत्रात कार्यरत आहे. नवीन सरकारमध्ये टीडीपीचे १६ खासदार आहेत, हे गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. भविष्यामध्ये सरकारबाबत दिसणारी कथित अस्थिरता ही हळूहळू स्थिरतेकडे वळेल. त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसेल आणि बाजारदेखील स्थिर पण तेजीकडे झुकू शकतो. पाच वर्षे स्थिर सरकार लाभल्याने गुंतवणूकदारांचा बाजारात असणारा विश्वास वाढत आहे. त्यामुळेच गुंतवणूकदार गुंतवणूक करीत आहेत. तशा प्रकारचा आधार शेअर बाजारामध्ये मिळत आहे. चार जून रोजी निफ्टीची घसरणही २१ हजार ८८४ या पातळीपर्यंत झाली होती. तिथून बाजार ब-याच अंशी वर आला आहे.
गतसप्ताहात निफ्टीमध्ये एकाच दिवसामध्ये १९७१ कोटी रुपयांचे ऑर्डर व २८.०५ कोटींच्या ट्रेडचे प्रोसेसिंग झाले. अशा प्रकारचे ट्रँझॅक्शन एकाच दिवसामध्ये झाल्याने हा विश्वविक्रम ठरला. गतसप्ताहात अदानी ग्रुप, अंबुजा सिमेंट, एसीसी इत्यादी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजेच जवळपास ५ टक्क्यांहून अधिक तेजी दिसली. एनडीए सरकारमधील टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांची प्रतिमा ही उद्योगधंद्यांसंदर्भामध्ये सकारात्मक दिसते. तशा प्रकारचा अनुभव हैदराबादमध्ये आयटी इंडस्ट्री व अन्य उद्योगधंदे वाढीसाठी त्यांनी केलेल्या जाणीवपूर्वक प्रयत्नातून मागील काळात आला आहे. त्यामुळे शेअर बाजार त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा बाळगून आहे.