माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील धक्कादायक प्रकार
श्रीक्षेत्र माहूर : माहूर-किनवट राष्ट्रीय महामार्गावरील नखेगाव ते हिवळणी फाट्यादरम्यान मुख्य रस्त्यावर असलेल्या हिवळणी येथील तुळशीराम राठोड यांच्या शेताच्या धु-यावर अज्ञात महिलेला पालापाचोळा टाकून जिवंत जाळल्याची घटना दि. ५ रोजी रात्री ८ वाजता घडली.
राष्ट्रीय महामार्गावरील हिवळणी फाट्याजवळ असलेल्या तुळशीराम राठोड यांच्या शेतात विहिरीजवळ स्पिंकलरचे ६१ पाईप आणि आठ नोझल ठेवलेले होते. त्याच्या बाजूलाच कापसाच्या झाडाच्या पालाट्याचा ढीग मारून ठेवण्यात आला होता. त्या ठिकाणीच सदरील महिला जळून राग झालेल्या अवस्थेत पडलेली होती. पोलिसांच्या पाहणीत तिच्या हातात बांगड्या आणि पायात जोडवे दिसून आले. या व्यतिरिक्त तिची ओळख पटण्यासारखा कुठलाही पुरावा तेथे आढळून आला नाही. रात्री आठ वाजता राष्ट्रीय महामार्गापासून २०० मीटर अंतरावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आग दिसल्याने त्यांनी तुळशीराम राठोड यांच्या घरी दूरध्वनीवरून कल्पना दिली. त्यामुळे त्यांनी शेतात येऊन बघितले असता त्यांना स्प्रिंकलर आणि पाईप पालाट्या जळलेल्या अवस्थेत दिसल्या तर एक महिलाही संपूर्णपणे जळून खाक झालेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांनी माहूर पोलिस ठाण्यात दूरध्वनीद्वारे घटनेची कल्पना दिली.
घटनेची माहिती मिळताच माहूर पोलिस ठाण्याचे सपोनि शिवप्रकाश मुळे सपोनि परगेवार पोउपनि आनंदराव वाठोरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माहूरच्या रुग्णालयात आणला. घटनेचा तपास सपोनि शिवप्रकाश मुळे हे करीत आहेत.