नागपूर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात पूर्ववैमनस्यातून बाप-लेकाची शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना अजनी पोलिस ठाण्यांतर्गत रामटेकेनगर टोलीत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. राज्य सरकार शहरात असताना दुहेरी हत्याकांडाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
सभागृहात विरोधी पक्ष शहरातील कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला धारेवर धरत असतानाच ही घटना घडल्याने पोलिसांना चांगलाच घाम फुटला आहे. विजय बजरंग सावरकर (वय ५४) आणि मयूर विजय सावरकर (वय २७) अशी मृतांची नावे आहेत. आरोपींमध्ये परिसरातीलच सराईत गुंड संदीप नाडे, बादल गणेश कुर्वेती, शुभम गणेश कुर्वेती यांच्यासह १७ वर्षांचा अल्पवयीन आणि एका अज्ञात आरोपीचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मयूरविरुद्ध खुनासह गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याचे वडील विजय यांच्याविरुद्धही जुने गुन्हे नोंद आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते गुन्हेगारीपासून दूर होते. सावरकर बाप-लेकाची बेलतरोडी मार्गावर ‘सावरकर फर्निचर’ नावाने दुकान आहे.
मुख्य आरोपी संदीप नाडे हा जुगार, सट्टापट्टी आणि खुनाच्या घटनांत सक्रिय आहे. जवळपास ३ महिन्यांपूर्वी कोणत्यातरी कारणावरून शुभमचा मयूरशी वाद झाला होता. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास शुभम घराजवळील सुजाता बौद्ध विहाराजवळ मोबाईलवर गेम खेळत बसलेला होता. या दरम्यान मयूर तेथे आला. त्याने शुभमच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले.
आरोपी शस्त्रांसह आले होते तयारीने
शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शुभमचा भाऊ बादल ‘सावरकर फर्निचर’समोरील रस्त्याच्या बाजूला बसलेला होता. मयूर त्याच्या जवळ गेला आणि शुभमसोबत असलेल्या वादातून त्याच्या पायावर लोखंडी रॉडने वार केला. भावावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच शुभम, संदीप, अल्पवयीन आणि अज्ञात आरोपी तेथे पोहोचले. शुभमजवळ गुप्तीसारखे शस्त्र होते.
आधी वडिलांवर केला हल्ला
आरोपींनी आधी मयूरचे वडील यांच्या छातीत गुप्ती भोसकली. त्यानंतर मयूरला पकडण्यात आले. शस्त्रांनी सपासप वार करून आरोपी फरार झाले. बराच वेळपर्यंत बाप-लेक जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. दोघांनाही उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.