नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात दगडफेक झाल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. नाशिकच्या भद्रकाली परिसरात दोन गटांमध्ये मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर दगडफेक झाली होती, यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
नाशिकच्या भद्रकाली भागामध्ये दोन गट समोरासमोर आले आणि त्यानंतर तुफान दगडफेक सुरू झाली. दगडफेकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जचाही वापर करावा लागला आहे, तसंच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. यामुळे भद्रकाली परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
नाशिकमध्ये हिंदूत्ववादी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते, पण हिंदूत्ववादी संघटनांच्या रॅलीदरम्यान भद्रकाली परिसरात काही दुकाने उघडी होती, त्यामुळे संघटनांनी दुकानं बंद करण्याचे आवाहन केले. यानंतर वाद सुरू झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत आणि नंतर दगडफेकीमध्ये झाले, यामुळे नाशिकमधली परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
या दगडफेकीमध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच काही पोलिसांनाही दगड लागल्याची माहिती मिळत आहे.