27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजननिवडणुकीच्या प्रचाराला ग्लॅमरचा तडका

निवडणुकीच्या प्रचाराला ग्लॅमरचा तडका

 मुंबई : विधानसभेच्या निवडणूक प्रचाराच्या तोफा आता धडाडू लागतील. या रणधुमाळीत मनोरंजन विश्वातील तारे-तारका लाखोंच्या सुपा-या खिशात टाकून प्रचाराला ग्लॅमरचा तडका देताना दिसणार आहेत.  तर दुस-या बाजूला काही कलाकार ‘नको ते राजकारण’ अशी भूमिका घेत २५ लाख रुपयांची सुपारीसुद्धा नाकारत असल्याचे चित्र आहे.
 निवडणुकीत कलाकारांचा ‘भाव’ वधारतो. लोकसभा निवडणुकीत हिंदीतील कलाकारांची सुपारी २० लाख रुपये होती, पण विधानसभा निवडणुकीत ती २५ लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. परंतु चंकी पांडेसारखे काही अभिनेते २५ लाख रुपयांची सुपारी देऊ करूनही प्रचाराला यायला तयार नाहीत. नृत्यांगना गौतमी पाटीलचे प्रचारासह परफॉर्मन्सचे बजेट अडीच ते तीन लाखांपर्यंत पोहोचल्याचे समजते. छोट्या पडद्यावरील कलाकार दीड-दोन लाख रुपयांची मागणी करत आहेत तर काहीजण ५० हजारांतही कोणत्याही उमेदवाराचा झेंडा खांद्यावर घेण्यास गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
 कायम डिमांडमध्ये असलेले काही मराठी कलाकार साडेसात लाख रुपयांपासून पुढे मानधनाची मागणी करत आहेत.   निवडणुकीच्या निमित्ताने इव्हेंट मॅनेजर्स आणि कलाकारांना सुपा-या मिळवून देणा-यांचीही चांदी आहे. कलाकारांसाठी निश्चित केलेल्या मानधनापैकी ५० टक्के रक्कम मध्यस्थ्यांच्या खिशात जाण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. काही कलाकारांनी तर राजकीय पक्षांचे गंडे बांधल्याने ते त्यांच्याच पक्षाच्या प्रचारात दिसतील.
 पळवापळवी होण्याची भीती
  प्रचारासाठी कलाकारांची पळवापळवी केली जाण्याची भीती असल्याने सध्या कोणता कलाकार कुठे प्रचाराला जाणार याबाबत गुप्तता बाळगली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राज ठाकरे यांचे मित्रयादीतील जास्तीतजास्त कलाकार प्रचारासाठी उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  भाजप, शिंदेसेनेकडे मांदियाळी
सध्या भाजप आणि शिंदेसेनेकडे कलाकारांची मांदियाळी आहे. मनसेशी असलेल्या कलाकारांची संख्याही मोठी आहे. या तुलनेत उद्धवसेना आणि शरद पवार गटाकडे हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच कलाकार आहेत. अजित पवार गटात सयाजी शिंदे यांनी एन्ट्री केली आहे. गार्गी फुले, ओमकार भोजने हेही त्यांच्यासोबत आहेत. उद्धव सेनेत आदेश बांदेकर आणि शरद पवार गटात डॉ. अमोल कोल्हे आहेत.
 भाजपच्या तंबूत…
एन. चंद्रा, मेघा धाडे, प्रिया बेर्डे, विजय पाटकर, दिग्दर्शक शिरीष राणे, वितरक समीर दीक्षित, किशोर कदम, किशोरी शहाणे, सुरभी हांडे, जॅकी श्रॉफ, प्रथमेश परब, अरुण नलावडे हे कलाकार आहेत.
  सध्या सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, रिंकू राजगुरू, प्राजक्ता माळी, स्वप्नील जोशी, मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, अंकुश चौधरी आदी कलाकारांना मागणी आहे; पण यांपैकी काही कलाकार प्रचारापासून दूर राहणेच पसंत करतात. याखेरीज ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमांतील कलाकारांनाही मागणी आहे.
शिंदेसेनेच्या गोटात...
शिंदेसेनेमध्ये मंगेश देसाई, प्रवीण तरडे, प्रसाद ओक, विजय निकम, सुशांत शेलार, विजू माने, हार्दिक जोशी, शर्मिष्ठा राऊत, केतन क्षीरसागर, माधव देवचके, आदिती सारंगधर, शेखर फडके, प्रतीक पाटील, अमोल नाईक, योगेश शिरसाट, राजेश भोसले यांचा समावेश आहे.
मनसेच्या गोटात...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महेश मांजरेकर, अभिजित पानसे, तेजस्विनी पंडित, सचिन खेडेकर, विनय येडेकर, अजित भुरे, पुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदार, संजय नार्वेकर, सायली संजीव, स्मिता तांबे हे कलाकार ठरलेलेच आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR