आग्रा : वृत्तसंस्था
पती-पत्नीमध्ये अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असतात. अनेकवेळा परिस्थिती अशी बनते की, वाद वेळीच सोडवले नाहीत तर नाते तुटण्यापर्यंत मजल जाते. मात्र, उत्तर प्रदेशातून एक अशी बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. पतीच्या स्वच्छ न राहण्याच्या सवयीला एक महिला इतकी कंटाळली की, तिने लग्नाच्या ४० दिवसांनंतरच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा महिन्यातून फक्त एक किंवा दोनदाच आंघोळ करतो, त्यामुळे त्याच्या अंगातून उग्र वास येतो. याच कारणामुळे तिला आता त्याच्यापासून घटस्फोट हवा आहे. आग्रा येथील महिलेने कौटुंबिक समुपदेशन केंद्राशी संपर्क साधला आणि सांगितलं की, ती यापुढे तिच्या पतीसोबत अस्वच्छतेमुळे राहू शकत नाही. चौकशीदरम्यान महिलेच्या पतीनेही आपल्या आंघोळीची सवय कबूल केली. त्यानं सांगितलं की, तो महिन्यातून एकदा किंवा दोनदाच आंघोळ करतो आणि आठवड्यातून एकदा स्वत:वर गंगाजल शिंपडतो.
संबंधित पतीने लग्न झाल्यानंतर ४० दिवसांत पत्नीच्या विनंतीवरून फक्त ६ वेळा आंघोळ केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, लग्नाच्या काही आठवड्यांनंतर दोघांमध्ये स्वच्छतेवरून वाद सुरू झाला. त्यानंतर महिलने पतीचे घर सोडले आणि माहेरी राहू लागली. यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी छळाची तक्रार दाखल करून घटस्फोटाची मागणी केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांसोबत बातचीत केल्यानंतर पतीने दररोज आंघोळ करण्यास सहमती दर्शविली, परंतु पत्नी सहमत नव्हती आणि त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. आता पुढील सुनावणीसाठी या जोडप्याला २२ सप्टेंबर रोजी पुन्हा समुपदेशन केंद्राला भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सोशल मीडियावरही चर्चा आहे.