17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपरभणी हिंसाचार प्रकरणावरुन नाना पटोले आक्रमक

परभणी हिंसाचार प्रकरणावरुन नाना पटोले आक्रमक

मुंबई : परभणीत भारतीय राज्यघटनेची विटंबना करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हा प्रकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर व संविधानाला मानणा-या कोट्यवधी लोकांचा घोर अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे, असा संतप्त सवाल करून संविधानाची विटंबना करणा-यांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शासन करा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

परभणीतील घटनेवर प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रात संविधानाची विटंबना करणाचा प्रकार चिंतानजक व महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालण्यास लावणारा आहे. अशा विकृती शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजेच पण परभणीत आगडोंब उसळत असताना राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र मलईदार खाती व मंत्रीपदे वाटून घेण्यात व्यस्त आहेत. या सरकारला राज्याचे काही देणेघेणे नाही. संविधान न मानना-या विचाराचे लोक सत्तेत आहेत त्यामुळे असे प्रकार होत आहेत.

परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर शहरात पोलीसांनी अंबेडकरी अनुयायांना अमानुष मारहाण केली, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या, संचारबंदी लावली, इंटरनेट, एसटी सेवा बंद केली. पोलीस व प्रशासन परभणीतील परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकले नाहीत. आंबेडकरी अनुयायांना केलेल्या मारहणाची चौकशी करून जिल्हा पोलीस अधिक्षक यांना तात्काळ निलंबत करावे अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. परभणीतील घटनेचा नागपूरच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारू पण अशा घटना महाराष्ट्रात होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. लोकांनी अफवांना बळी न पडता लोकशाही मार्गाने या घटनेचा निषेध करावा असे आवाहनही पटोले यांनी केले आहे.

परभणी बंदला हिंसक वळण
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची मंगळवारी एका मनोरुग्णाने विटंबना केल्यानंतर बुधवारी बंद पुकारण्यात आलेल्या ‘परभणी बंद’ला हिंसक वळण लागले. शहरात दगडफेक, वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. काही ठिकाणी पोलिसांनी जमावावर लाठीमार व अश्रुधुराचा मारा केला. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याने संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांसमक्ष सदर मनोरुग्ण व्यक्तीला अमानुष मारहाण केली. त्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्याचा जीव वाचला. सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR